Banglore

मुडा घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा : : कृष्णा रेड्डी

Share

म्हैसूर शहर विकास प्राधिकरणात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराप्रकरणी कर्नाटक राष्ट्र समिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवी कृष्णा रेड्डी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर थेट निशाणा साधत राजीनाम्याची मागणी केली आहे.

आज हुबळी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना म्हैसूरमधील प्रतिष्ठित इस्टेटमध्ये सुमारे 30 ते 40 कोटी रुपये देण्यात आले होते. सिद्धरामय्या यांनी स्वत:च्या कुटुंबाच्या फायद्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करून मौल्यवान भूखंडांचे बेकायदेशीर वाटप करून हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, हे सर्वश्रुत आहे. हा घोटाळा पूर्णत: बेकायदेशीर असून लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या षडयंत्राने भरलेला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याविरोधात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत 10 जुलै रोजी म्हैसूर येथील मुडा कार्यालयाला घेराव घालणार असल्याचे रवी कृष्णा रेड्डी यांनी सांगितले.

मुडा घोटाळ्याच्या मुद्द्यावर भाजप आणि जेडीएस पक्ष संसदेत असो किंवा बाहेर असो, गांभीर्याने लढणार नाही याची खात्री राज्यातील जनतेला आहे, अशी तक्रार त्यांनी केली. याबाबत मुडाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून गेल्या दहा वर्षात मुडाने वाटप केलेल्या सर्व भूखंडांची मंजुरी रद्द करून सर्वंकष चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

पत्रकार परिषदेला चंद्रशेखर मठद, एन.मूर्ती, मल्लिकार्जुन रोट्टीगवाड आदी उपस्थित होते.

Tags: