Belagavi

बसवण कुडचीत खिलार जनावरांचे प्रदर्शन व कुस्त्या

Share

बेळगाव तालुक्यातील बसवण कुडची गावात श्री कलमेश्वर, श्री बसवण्णा व श्री ब्रम्हदेवाच्या जत्रेनिमित्त खिलार जनावरांचे प्रदर्शन व कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.

बसवण कुडची तानाजी गल्ली येथील श्रीराम युवक मंडळाने वार्षिक यात्रेनिमित्त खिलार जनावरांचे प्रदर्शन व कुस्त्यांचे आयोजन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावचे नगरसेवक बसवराज मोदगेकर व समाजसेवक परशराम बेडका तसेच गावचे पंच अप्पूनी चौगुले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व हार घालून पूजा करून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. गावातील 35 बैल जोड्यांनी यामध्ये भाग घेतला होता.

गावातील तानाजी गल्ली येथून बसवण्णा मंदिरापर्यंत सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व बैलजोडी मालकांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी जोतिबा मुतगेकर, नामदेव जैनोजी, निळकंठस्वामी हिरेमठ, डॉ मल्लाप्पा हम्मनावर, नामदेव मुतगेकर, संदीप मुतगेकर, लक्ष्मण मुतगेकर, ओमकार जैनोजी, परशराम पाटणेकर, राजू मुतगेकर, शिवाजी रवळूचे, जोतिबा परीट, महेश मुतगेकर, दिनेश रवळूचे, भरमा हसबे व श्री राम युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, श्री कलमेश्वर, श्री बसवण्णा व श्री ब्रम्हदेवाच्या जत्रेनिमित्त खळ्यांच्या कुस्त्यांचे आयोजन केले होते. कुडची येथील गावातील तलावाजवळील मैदानात या कुस्त्या झाल्या. लहान मुलांनी कुस्तीत चढाओढीने भाग घेऊन चुरशीने कुस्त्या खेळल्या. लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांनीही कुस्त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Tags: