Belagavi

आव्हानात्मक कामासाठी बेळगाव पोलीस अभिनंदनास पात्र : एडीजीपी हितेंद्र

Share

पोलीस आणि अन्य सरकारी खात्यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. अन्य खात्यांच्या तुलनेत पोलिसांचे काम आव्हानात्मक आहे. राज्यातील पोलीस ते जबाबदारीने पार पाडत आहेत. पोलिसांच्या कल्याणासाठी खात्यातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. हितेंद्र यांनी सांगितले.

बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या बेळगाव दौऱ्यावर आलेल्या एडीजीपी हितेंद्र यांना आज बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे मानवंदना देण्यात आली. बेळगाव जिल्हा पोलीस कवायत मैदानावर झालेल्या शानदार समारंभात एडीजीपी हितेंद्र यांनी पोलीस संचलनाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या मार्केट, खडेबाजार, ग्रामीण सब डिव्हिजन, वाहतूक पोलीस, राखीव पोलीस दलातर्फे सवाद्य पथसंचलन करून त्यांना मानवंदना देण्यात आली. डीसीपी रोहन जगदीश यांनी परेड कमांडर पदाची धुरा सांभाळली.

मानवंदना स्वीकारून उपस्थितांना संबोधित करताना एडीजीपी हितेंद्र म्हणाले की, राज्यातील पोलिसांच्या कल्याणाकरिता विभागातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. विविध ठिकाणी लवकरच पोलीस कॉन्स्टेबल्ससाठी 5 घरे बांधण्यात येणार आहेत. अनेक पोलीस गृहनिर्माण प्रकल्प प्रारंभ ते पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत. पोलीस स्थानकांसाठीही नव्या इमारती बांधून देण्यात येत आहेत. पोलिसांच्या विम्याच्या रकमेचा निधी देण्यासाठी खात्याने सरकारला नुकताच प्रस्ताव पाठवला आहे.

बेळगाव पोलिसांचे विशेष अभिनंदन करतो असे सांगून एडीजीपी हितेंद्र म्हणाले की, राज्यातील अन्य ठिकाणांच्या तुलनेत बेळगाव शहर व जिल्ह्यात काम करणे हे पोलिसांसष्ठी आव्हानात्मक आहे. तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या बेळगावात हिवाळी अधिवेशनही होते. या काळात कायदा व सुव्यवस्था चोख राखून कुठेही तंटे-तक्रार येणार नाही यासाठी बेळगाव पोलीस दक्षतेने काम करतात, त्याशिवाय एरव्ही गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे कर्तव्यही चांगले पार पाडतात. यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

प्रारंभी बेळगावचे पोलीस आयुक्त सिद्रामप्पा यांनी स्वागत करून एडीजीपी हितेंद्र यांच्या दौऱ्याची माहिती दिली. काल, शुक्रवारी त्यांनी पोलीस आयुक्तालयातील प्रशासकीय कामकाजाचे निरीक्षण केले, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उत्तर विभागाचे आयजीपी विकासकुमार विकास, एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद, डीसीपी स्नेहा पी. व्ही. यांच्यासह एसीपी, विविध पोलीस स्थानकांचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच नागरी व राखीव पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: