कर्करोग, मधुमेहासह अन्य असाध्य आजारांवर संशोधन करण्यासाठी बेळगावच्या केएलई विद्यापीठाच्या वतीने विशेष संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रात वैद्यकीय संशोधन करू इच्छिणाऱ्या देशभरातील संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बेळगावात आज, शुक्रवारी केएलई विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. प्रभाकर कोरे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, देशात आरोग्य क्षेत्रात कॅन्सर, डायबेटीस व अन्य असाध्य आजारांवर अधिकाधिक संशोधन व्हायला हवे. या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केएलई संस्था कार्यरत आहे. केएलई संस्थेत देश-परदेशातून विद्यार्थी येऊन संशोधन करावे, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध देण्यासाठी केएलई संस्था संशोधन केंद्राची संकल्पना राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. येथे इनोव्हेशन आणि रिसर्च याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. येथे संशोधन करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना सर्व आवश्यक मूलभूत सुविधा, कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येत्या 1 जानेवारीला या केंद्राचे उदघाटन प्रथितयश शास्त्रज्ञांकडून करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रात भारत बराचसा पिछाडीवर आहे. त्यासाठी केएलई संस्थेने हा महत्त्वाचा प्रकल्प उभारला आहे. आयआयटी कानपूरचे निखिल अग्रवाल यांच्यावर या केंद्राची धुरा सोपविण्यात येणार आहे. केएलई संस्थेत आम्ही मधुमेह, कर्करोग आणि वैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हाने असलेल्या विविध आजारांवर संशोधन करण्यासाठी केंद्र उभारणार आहोत. देशाच्या कोणत्याही भागातील कोणालाही केएलई संशोधन केंद्रात विविध रोगांवर संशोधन करता येईल असे डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले. केएलई संस्थेच्या स्थापनेला 108 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त 108व्या वर्धापनदिन समारंभाचे आयोजन उद्या केले आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सुवर्णपदके देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केएलई इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटरची कल्पना विशद करताना काहेरचे कुलगुरू डॉ. नितीन गंगणे म्हणाले की, असाध्य रोगांवर संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यात कसलाही व्यावसायिक उद्देश नाही. इच्छुक संशोधकांना संशोधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. वैद्यकीय संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांकडून संशोधकांना आर्थिक पाठबळ देण्याचा विचार आहे. जैवशास्त्रीयदृष्ट्या संशोधन करणाऱ्या देशभरातील नागरिकांचे केंद्रात स्वागत आहे. त्यांच्याकडून कोणतेही शुल्क न घेता संशोधनासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. डॉ. योगेश कुलकर्णी आणि डॉ. अपूर्वा पाटील केंद्राचे समन्वयक आहेत अशी माहिती डॉ. नितीन गंगणे यांनी दिली.


Recent Comments