लवकरात लवकर जागा शोधून काढा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बेळगावात पत्रकारांसाठी भव्य प्रेस क्लब बांधून देऊ अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री, बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.


कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने कन्नड भवन, बेळगाव येथे मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार के. व्ही. प्रभाकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्या समारंभात ते बोलत होते.

प्रसारमाध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो. ते विधिमंडळ, न्यायिक आणि कार्यकारी शाखेला जोडण्याचे काम करते. माझ्या अभ्यासादरम्यान संयुक्त कर्नाटक आणि कन्नडम्मा अशी दोन वृत्तपत्रे होती. आज पत्रकारितेमध्ये खूप बदल झाला आहे. समाजमाध्यमांचे प्रस्थ खूप वाढले आहे. पत्रकार समाजासाठी रात्रंदिवस काम करतात. बेळगावात पत्रकारांसाठी प्रेस क्लब बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. तुम्ही लवकर जागा शोधून द्या, मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रेस क्लब उभारून देऊ असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकार म्हणाल्या की, समाजातील वाईट गोष्टी काढून टाकण्याचे काम पत्रकार यशस्वीपणे करत आहेत. खऱ्या बातम्या समाजापर्यंत पोचवणे ही पत्रकाराची जबाबदारी आहे. विषयाला बगल देणे योग्य नाही. पत्रकारांनी जबाबदारीने चांगल्या बातम्या प्रसारित केल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार के. व्ही. प्रभाकर म्हणाले की, दहावीनंतर रोज सकाळी मी पेपर टाकून कॉलेजला जात होतो. सायकलला माझ्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. पत्रकारांप्रमाणेच वृत्तपत्र वितरक ऊन-पाऊस, थंडी-वाऱ्याची पर्वा न करता बाराही महिने लोकांना वृत्तपत्रे वितरित करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या श्रमाची दखल घेतली पाहिजे. म्हणून यंदा गौरप्पा नामक ७६ वर्षीय वृत्तपत्र वितरकाला राज्योत्सव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी माझे कार्यालय २४ तास सुरु राहील असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पत्रकारांचे मासिक वेतन दहा हजारांवरून बारा हजार रुपयांपर्यंत वाढवले असून पत्रकारांच्या अंत्यविधीच्या सहायधनातही वाढ केली आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना मोफत बसप्रवास करू देण्याच्या मागणीत मुख्यमंत्र्यानी लक्ष घालून परिवहन खात्याला याबाबत निर्देश दिले आहेत. बेळगावात सरकारी निवासी योजनेत पत्रकारांना घरे राखीव ठेवण्याच्या मागणीचाही मी पाठपुरावा करेन अशी ग्वाही प्रभाकर यांनी दिली.
गदग, डंबळ येथील तोंटदार्य मठाचे जगद्गुरु डॉ. सिद्धाराम महास्वामी म्हणाले की, पत्रकारांना समाजात विशेष स्थान आहे. पत्रकार सरकार आणि समाज यांच्यामध्ये दुवा म्हणून करतात. पत्रकारांच्याही अनेक समस्या असतात, सरकारने त्या सोडविण्याची गरज आहे.
आमदार राजू सेठ यावेळी बोलताना म्हणाले की, समाजातील भ्रष्टाचार रोखण्यात सर्व प्रसारमाध्यमे यशस्वी झाली आहेत. आज बेळगाव जिल्ह्यातील वर्तमानपत्रे समाजाबरोबरच अचूक बातम्या प्रसारित करत आहेत. कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या या सत्कार सोहळ्यात सहभागी होऊन आनंद झाला असे सांगून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष शिवानंद तगडूर म्हणाले की, हा सीमावर्ती जिल्हा एकसंध आहे. बेळगाव राज्याची राजकीय दिशा बदलत आहे. आमच्या या कार्यक्रमात सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर या दोन मंत्र्यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेने मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार के. व्ही. प्रभाकर यांचा सत्कार केल्याने आनंद झाला आहे. प्रत्येक टप्प्यावर कष्ट करून यश मिळवलेले प्रभाकर पत्रकारांसाठी एक आदर्श आहे.
कर्नाटक श्रमजीवी पत्रकार संघाच्या जिल्हा युनिटतर्फे आयोजित सत्कार समारंभात राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस जी. सी. लोकेश, आशिया विभाग संचालक एच. आय. मदनगौडा, राज्य उपाध्यक्ष पुंडलिक बाळोजी उपस्थित होते. समारंभाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते वृत्तपत्र वितरकांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील, शहर पोलिस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर, एसपी भीमाशंकर गुळेद, पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, माहिती व जनसंपर्क खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आदी उपस्थित होते. फ्लो
यावेळी शुभरत्ना नायक, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीपकुमार कुरंदवडे, उपाध्यक्ष व इन न्यूजचे संपादक राजशेखर पाटील, सर्वोत्तम जारकीहोळी, यल्लाप्पा तळवार, अरुण पाटील, चेतन होळेप्पागोळ, नौशाद बिजापूरे, मंजुनाथ पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजकुमार बागलकोटी, सुनिल गावडे, इरणगौडा पाटील, सुरेश भि. बालोजी, राजेंद्र कोळी, भीमप्पा पिडाडी, रवी हळुकुंद, लीना टोपन्नावर, सुकुमार बन्नुरे, एरन्ना बसप्पा बुद्धगोल, सूर्यकांत पाटील, जीएच होंगल, संजीवकुमार, दिलीप मजलीकर, कृष्णप्पा गिरेन्नावर, बसवराज चमकेरी आदी उपस्थित होते.


Recent Comments