कमी-जास्त दाबाने वीज पुरवठा झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागून सुमारे दोन लाख रुपयांचे घरगुती साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही घटना आज सकाळी बेळगावातील शिवाजीनगरात घडली.

बेळगावातील शिवाजीनगर परिसराला वारंवार हाय-लो व्होल्टेजची समस्या भेडसावत आहे. याबाबत रहिवाशांनी वरचेवर हेस्कॉमला कळवून देखील तात्पुरती दुरुस्ती केली जाते. कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही अशी रहिवाशांची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच या भागात व्होल्टेज हाय-लो होत होते. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन अनेकांच्या घरातील इलेक्ट्रिक उपकरणे जळाली. शिवाजीनगर फर्स्ट में सेकंड क्रॉस येथील रहिवासी प्रिया आंबेवाडीकर यांच्या घरात शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रिया आंबेवाडीकर यांचे पती नाहीत. त्या व त्यांचा मुलगा दोघेच घरात असतात. चरितार्थासाठी त्या खासगी नोकरी करतात. घटना घडली त्यावेळी त्या कामावर गेल्या होत्या. सकाळी साडेआठपासूनच व्होल्टेज लो-हायची समस्या सुरु होती. त्यानंतर शॉर्टसर्किट होऊन त्यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील फ्रिज, वाशिंग मशीन, ओव्हन आदी इलेक्ट्रिक उपकरणे, दैनंदिन वापराच्या वस्तू, धान्य, कपडे आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेने या गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या संदर्भात इन न्यूजशी बोलताना विनया सुहास चौगुले यांनी सांगितले की, माझी मैत्रीण प्रिया आंबेवाडीकर यांच्या घरात शॉर्टसर्किटने आग लागून मोठे नुकसान झाले आहे. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे ही वेळ आली आहे. शिवाजीनगर परिसरात कमी-जास्त दाबाने वीज पुरवठा होतो. याबाबत हेस्कॉमकडे तक्रार केल्यावर तात्पुरती दुरुस्ती केली जाते. या समस्येमुळे येथील अनेक घरातील टीव्ही, फ्रीज आदी उपकरणे जळाल्याचे प्रकार घडले आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
दुर्घटना पीडित प्रिया आंबेवाडीकर यांनी सांगितले की, माझे पती नाहीत, मी व माझा मुलगा असे दोघेचजण आम्ही घरात असतो. घर चालविण्यासाठी मी नोकरी करते. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे ही आग लागली असून त्यात आमचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हाला योग्य भरपाई देऊन ही समस्या कायमची सोडवावी अशी मागणी केली.
घटनास्थळी आलेल्या एका वायरमनने सांगितले की, शिवाजीनगर भागात कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा होऊन अनेकांच्या घरातील इलेक्ट्रिक उपकरणे जळाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तक्रार दिली की, हेस्कॉमचे कर्मचारी येतात, तात्पुरती दुरुस्ती करतात अन निघून जातात. येथील ट्रान्सफॉर्मर कमी क्षमतेचे असतील आणि त्यावर अधिक लोड येत असेल तर हेस्कॉमने नवे उच्चक्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवण्याची किंवा लोड विभाजित करण्याची गरज आहे. याबाबत अनेकदा सांगूनही हेस्कॉम दखल घेत नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, शेजारी-पाजाऱ्यांनी व अग्निशमन दलाने आग विझविली. या आगीत एका गरीब कुटुंबाचे अतोनात नुकसान झाल्याने शिवाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, हेस्कॉमने या कुटुंबाला योग्य प्रमाणात भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणाची नोंद मार्केट पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


Recent Comments