बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे बेळगाव महानगरपालिका हद्दीत विलीनीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे बोर्डाचे पदसिद्ध अध्यक्ष व मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची बैठक आज बोर्डाच्या कॅम्प येथील कार्यालयात पार पडली. यावेळी खासदार मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी म्हणाले की, देशातील सदर्न कमांडच्या कक्षेतील दहा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे त्या-त्या महापालिकांमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या यादीत बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नाव नाही.

त्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे बेळगाव महापालिकेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव सध्या तरी नाही. बोर्डाला सरकारकडून यंदा अपुरा निधी आल्याने विकासकामे राबविताना अडचणी येत आहेत. त्यामुळे बोर्डाच्या हद्दीत विकासकामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी स्थानिक विकासनिधीतून अनुदान मंजूर करण्याचे आवाहन ब्रिगेडियर मुखर्जी यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना केले.
या बैठकीत बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राबविण्यात यावयाच्या पाणी, रस्ते, गटारी आदी मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी आजच्या बैठकीत बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे बेळगाव पालिकेत विलीनीकरण करण्याचे ब्रिगेडियर मुखर्जी यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले.
संरक्षण मंत्रालयाच्या अधीन असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डांपैकी काही बोर्डांचे जवळच्या पालिकांमध्ये विलीनीकरण होणार आहे. मात्र त्यात बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश नसल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय अन्य काही विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी सांगितले की, कर्नाटक शासनाच्या निर्देशानुसार, बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे बेळगाव महापालिकेत विलीनीकरण करण्यास हरकत नसल्याचा ठराव बेळगाव पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत मंजूर करण्यात आला होता. मात्र संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप असा प्रस्ताव नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले आहे.
आजच्या बैठकीत महात्मा गांधी चौक ते हनुमान नगरपर्यंतच्या रस्त्याच्या विकासकामाला बोर्डाने अनुमती दिल्यास, बेळगाव पालिकेतर्फे हे काम करण्याची तयारी आम्ही दर्शवली आहे. याशिवाय विकासाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आल्याचे आ. सेठ यांनी सांगितले.
यावेळी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments