धनगर समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या शेफर्ड्स इंडिया इंटरनॅशनलचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन उद्यापासून बेळगावात भरविण्यात येणार आहे. या अधिवेशनात धनगर समाजाचे देशातील एकमेव मुख्यमंत्री असलेल्या सिद्दरामय्या यांचा भव्य राष्ट्रीय सत्कार करण्यात येणार आहे.

बेळगावात आज पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन शेफर्ड्स इंडिया इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री एच. विश्वनाथ यांनी सांगितले की, बेळगावात येत्या मंगळवारी शेफर्ड्स इंडिया इंटरनॅशनलचे नववे खुले अधिवेशन होणार आहे. त्याला देशभरातून दोन लाख धनगर समाजबांधव उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. उद्या सोमवारी दुपारी हॉटेल संकम येथे संस्थेच्या कार्यकारिणीची सभा होणार आहे. त्यात अधिवेशनात करावयाच्या मागण्या, ठरावांवर चर्चा करून अंतिम मसुदा तयार करण्यात येईल. खुल्या अधिवेशनात हे ठराव मांडण्यात येतील. त्याचप्रमाणे संपूर्ण देशातील धनगर समाजाचे एकमेव मुख्यमंत्री असलेले सिद्दरामय्या यांचा भव्य राष्ट्रीय गौरव करण्यात येणार आहे. देशभरातील धनगर समाजाचे लोकप्रतिनिधी, शेफर्ड्स इंडियाचे व संघ-संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचे विश्वनाथ यांनी सांगितले.

यावेळी बोलताना माजी मंत्री एच. एम. रेवण्णा म्हणाले की, देशभरातील धनगर समाजाच्या प्रगतीसाठी शेफर्ड्स इंडिया इंटरनॅशनलची २ ऑक्टोबर २०१४ला स्थापना करण्यात आली आहे. समाजाच्या विकासासाठी देशभरात फिरून जनजागृती करण्यात आली आहे. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण देशात दलित-अल्पसंख्यांक सोडले तर सर्वाधिक १२ कोटी लोकसंख्या धनगर समाजाची आहे. या समाजाला कर्नाटकात कुरुबर, कुरुब, तेलंगणात कुरुंबा, महाराष्ट्रात धनगर, उत्तर भारतात पाल, देवासी आदी अनेक नावांनी संबोधण्यात येते. या सर्व समाजाला एकत्र आणून त्याचे मजबूत संघटन करून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शेफर्ड्स इंडिया इंटरनॅशनलची स्थापना केली असून, त्याच हेतूने बेळगावात हे अधिवेशन घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला धनगर समाज नेते माजी विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, वेदप्रकाश, विधान परिषद सदस्य नागराजू यादव आदी उपस्थित होते.


Recent Comments