Belagavi

स्मार्ट सिटीच्या स्मार्ट बस स्टँडचे पार्किंग मात्र चिखलात; अनेक गैरसोयी

Share

मोठा गाजावाजा करून स्मार्टसिटी बेळगावात एकदा स्मार्ट बस स्टँडची उभारणी झाली आहे. मात्र त्याच्या पाठीमागे असलेल्या टू व्हीलर पार्किंग मात्र सांडपाणी, चिखल-दलदलीचे साम्राज्य बनले असून, त्यामुळे प्रवाशांना त्रास भोगावा लागत आहे.

होय, करोडो रुपये खर्चून स्मार्टसिटी बेळगावात एकदाचे स्मार्ट बस स्टँड साकारले आहे. 5-6 वर्षांपासून रखडत कसे का होईना हे स्मार्ट बस स्टॅन्ड उभे राहिले आहे. परंतु, प्रवाशांचे हाल मात्र अजून काही संपलेले नाहीत. या स्मार्ट बस स्टॅन्डच्या मागे मोकळ्या जागेत उभारण्यात आलेले टू व्हीलर पार्किंग प्रवाशांसाठी गैरसोयींचे आगर बनले आहे. तास दोन तासाला 5 रुपयेपासून 24 तासांना 50 रुपये इतके पार्किंग शुल्क येथे वाहने लावण्यासाठी आकारले जाते. त्या मानाने सोयी-सुविधांचा मात्र ठावठिकाणा नाही. पार्किंगला लागूनच अनेक रिक्षाचालक लघुशंका करतात. सर्वत्र वाढलेले गवत, साचलेले सांडपाणी, पलीकडून वाहून येणारे मूत्र, चिखल, दलदल यातून वाट काढत प्रवाशांना आपल्या दुचाकी खुला जागेतच उभ्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना कंटाळवाणे वाटण्यासोबतच त्यांचा मूड ऑफ होऊन जातो. चारही बाजुंनी खुल्या असलेल्या जागेतच हे पार्किंग असल्याने येथे सुरक्षा नाही, वाहनेदेखील पावसातच उभी करावी लागतात.

या संदर्भात इन न्यूजशी बोलताना एक प्रवासी रावबहादूर चंद्रकांत कदम यांनी प्रवाशांची व्यथा सांगितली. मोठा गाजावाजा करून स्मार्टसिटीचे स्मार्ट बस स्टॅन्ड उभारण्यात आले आहे. पण प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था करताना प्रवाशांची काळजी घेतलेली नाही. गावाला जाताना प्रवासी स्वच्छ होऊन येतात. पण इथे आल्यावर त्यांना साचलेल्या विसर्जित मूत्र मिश्रित पाण्यातून, चिखलातून वाट काढत जावे लागते. येथे सर्वत्र सांडपाणी साचले असून, दलदल निर्माण झाली आहे. केएसआरटीसी विभागीय नियंत्रकांनी ही समस्या सोडविण्याकडे तातडीने लक्ष द्यायला हवे, केवळ एसी केबिनमध्ये बसून, कारमधून फिरून उपयोग नाही. वाहनांच्या सुरक्षेसाठी छत व गेट उभारणे, सांडपाण्याचा निचऱ्याची व्यवस्था करणे आदी उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.


एकंदर, गाजावाजा करून उभारलेल्या स्मार्टसिटीच्या स्मार्ट बस स्टँडमध्ये अनेक गैरसोयी असून, त्या दूर करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. याकडे परिवहन मंडळ, प्रशासन कधी लक्ष देणार हे पहावे लागेल.

Tags: