Gokak

संघटित संघर्षाने मराठा समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य : आमदार रमेश जारकीहोळी

Share

क्षत्रिय मराठा समाज संघटित झाल्यास बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी किमान 10 विधानसभा मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे. त्यापैकी तीन मतदारसंघात सहज विजय मिळवू शकतो, असे सांगतानाच मराठा समाजाने संघटित राहून विकास साधण्याचे आवाहन गोकाकचे आमदार, माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.

गोकाकमधील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात क्षत्रिय मराठा समाजाचे भव्य अधिवेशन पार पडले. त्याचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना आ. रमेश जारकीहोळी यांनी जिल्ह्यात मराठा समाजाचा प्रभाव वाढला असला तरी त्याला राजकीयदृष्ट्या अधिक प्राधान्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. गेल्या राज्यसभा निवडणुकीत मी पक्षश्रेष्ठींना मराठा समाजाला पक्षाची उमेदवारी देण्याची विनंती केली होती. यातून समाजावर होणारा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. पण आमच्यापैकी एकाने मराठा समाजाची मते कमी असल्याचा युक्तिवाद केल्याने आम्ही या समाजाला तिकीट देऊ शकलो नाही. मराठ्यांना योग्य प्रतिनिधित्व देण्याची विनंती आपण पक्षाच्या केंद्र आणि राज्यातील नेत्यांकडे वारंवार केली आहे, असे ते म्हणाले. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचे जारकीहोळी कुटुंब तयार आहे. या समाजाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आमदार रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.

मराठा समाजाने मागणी केल्याप्रमाणे गोकाक नगरपरिषदेकडून 24 तासात 6 गुंठे जागा देण्याच्या आशयाचे पत्र स्वामीजींना सुपूर्द केले. यावेळी जमलेल्या समाज बांधवांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केएमएफचे अध्यक्ष तथा अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले की, मराठा समाजाच्या 2-ए आरक्षणाचा लढा समाजातील स्वामीजींच्या नेतृत्वाखाली लढला तर येणाऱ्या काळात समाजाचे भले होईल. राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि हिंदुत्ववादी असलेल्या मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आपण सर्व सज्ज आहोत. रमेश जारकीहोळी, श्रीमंत पाटील, महेश कुमठळ्ळी यांच्या प्रयत्नाने राज्यात भाजपचे सरकार आले तरीही श्रीमंत पाटील यांना मंत्रिपदावरून डावलले गेल्याचे तुमच्यासारखेच दुख मलाही वाटते. याबाबत आम्ही वरिष्ठांशीही चर्चा करू. राज्यात भाजपला पुन्हा उभारी हवी आहे, तुमच्या समाजाची साथ हवी आहे. कोणत्याही कारणास्तव आमचा पक्ष सोडू नका. कमळ फुलण्यासाठी मराठा समाजाने आशीर्वाद देण्याची विनंती केली.

शिवाजी महाराज हे कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नव्हते. हिंदुत्व आणि अखंड भारताच्या उभारणीसाठी ते लढले. बेळगाव येथील सुवर्णसौध येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीसाठी पूर्ण सहकार्य करू असे आ. भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेंगळूरच्या गोसावी महासंस्थान भवानी दत्तपीठाचे जगद्गुरू वेदांताचार्य मंजुनाथ भारती महास्वामी होते. काद्रोळी येथील सद्गुरू गुरुपुत्र महाराज यांची दिव्य उपस्थिती होती.

कर्नाटक मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष मारुतीराव मुळे, क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष सुरेशराव साठे, राज्य बार कौन्सिलचे उपाध्यक्ष विनय मांगलेकर, लैला शुगर्सचे अध्यक्ष विठ्ठल हलगेकर, श्रीरामसेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, मोहन जाधव, भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस किरण जाधव, जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत, नगरसेविका निर्मला सुभानजी, प्रकाश मुरारी, नेते दशरथ गुड्डदमणी, अशोक तुक्कार, ज्योतिभा सुभानजी, परशुराम भगत, डॉ. गिरीश सूर्यवंशी, राजू पवार, नेताजी कोरडे, सचिन जाधव, डॉ. हणमंत कमतगी आदी उपस्थित होते.

Tags: