गोकाक तालुक्यातील कोण्णूर शहरातील देशाची सेवा करताना शहीद झालेले पहिले जवान जयपाल उपाध्ये यांची कन्या सावित्री हिला 1 फेब्रुवारी रोजी जैन साध्वी दीक्षा देण्यात येणार आहे. त्यानिमित्त आज तिची कोण्णूर शहरात भव्य सवाद्य मिरवणूक काढून निरोप देण्यात आला.

कोण्णूरमधील सावित्री जयपाल उपाध्ये या युवतीला 1 फेब्रुवारी रोजी जैनेश्वरी दीक्षा संस्था सिद्ध क्षेत्र सम्मेद शिखरजी येथे जैन साध्वी दीक्षा देण्यात येणार आहे. वात्सल्यमूर्ती आचार्य श्री १०८ गुणनंदीजी महाराजांचे पट्टशिष्य परमपूज्य गुरुदेव आचार्य श्री १०८ गुणानंदीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आरिका दीक्षा देण्यात येणार आहे. त्यानिमित्त कोण्णूर जैन समाजाच्या वतीने भव्य दीक्षा मिरवणुकीसह ओटी भरून निरोप देण्याचा कार्यक्रम आज पार पडला.

कोण्णूर येथील जैन बस्तीचे वैराग्य जीवन सोडून संन्यास स्वीकारणाऱ्या सावित्री जयपाल उपाध्ये यांची कोण्णूर शहरातील येथील बाजारपेठ, महावीर नगर, वाल्मीकी चौक, कामन चौक, आंबेडकर नगरातुन प्रमुख रस्त्यांवरून रथातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ओटी भरून तिला जैन समाजातर्फे निरोप देण्यात आला.
सावित्री लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. तिला अध्यात्मातही रस आहे. सावित्री आता सम्मेद शिखरजी येथे जैन साध्वीची दीक्षा घेण्यास तयार आहे. ती धार्मिक संस्कारांनुसार संन्यासीवृत्ती स्वीकारणार आहे. या संदर्भात बोलताना सावित्रीने सांगितले की, सर्वसंग परित्याग करून संन्यस्तवृत्ती स्वीकारल्यानंतर आता माझे वैयक्तिक म्हणून काही राहणार नाही. कमंडलू आणि पिंची एवढेच आपले साहित्य असेल. इथून पुढचे जीवन जैन धर्माचा प्रसार, प्रचार आणि जतन यासाठी घालवणार आहे. जैन धर्मियांनी नियमित बस्तीत येऊन पूजा, धर्मराधना करावी असे आवाहन केले.
यावेळी विविध जैन बस्तींचे मुनी, परिवारातील सदस्य, जैन समाजातील नेत्यांसह शेकडो लोक सहभागी झाले होते. याप्रसंगी सर्व जैन बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.


Recent Comments