Agriculture

नेगीलयोगी रयत संघाची हेस्कॉम कार्यालयासमोर निदर्शने

Share

शेतकऱ्यांना उन्हाळ्यात दहा तास अखंड वीज द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पावसामुळे खराब झालेले विद्युत खांब, लोम्बकळणाऱ्या उच्च दाबाच्या वीजतारांची दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी नेगीलयोगी रयत सेवा संघातर्फे बेळगावात आज हेस्कॉम कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

पावसामुळे शेतात कोसळलेले, कोसळण्याच्या स्थितीत असलेले वीजखांब आणि उच्च दाबाच्या तारांमुळे शेतकरी, जनावरे आणि पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यांची त्वरित दुरुस्ती करावी आणि उन्हाळ्यात शेतीला अखंड दहा तास वीज पुरवावी या मागण्यांसाठी नेगीलयोगी रयत संघातर्फे आज बेळगावात हेस्कॉम कार्यालयासमोर घोषणा देत आंदोलन छेडण्यात आले.

 

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नेगीलयोगी रयत सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष रवी पाटील यांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल, खानापूर, कित्तूर, यरगट्टी, सौंदत्ती या सर्व तालुक्यांतील ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे विजेचे अनेक खांब पडले आहेत. या खांबांच्या विद्युत तारा जमिनीला चिकटल्या आहेत. या वीजवाहिन्यांमध्ये हायव्होल्टेज वीज असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना व जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी या जमिनींवर शेतीची कामे करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे रखडली आहेत. याबाबत हेस्कॉम अधिकाऱ्यांना अनेकदा सांगूनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे आज आम्ही आंदोलन छेडले आहे.

यावेळी विजेचे खांब व तारा लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात. ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने सर्व समस्या दूर कराव्यात, अशी मागणी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
या आंदोलनात चंद्रू करेन्नावर, इरण्णा मुलीमनी, यशवंत मुलीमनी, गंगप्पा केंद्रे, निंगाप्पा कुरी, इरण्णा मरीगौडर यांच्यासह नेगीलयोगी रयत संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

Tags: