Belagavi

भक्तश्रेष्ठ संत कनकदासांच्या जयंतीची बेळगावात भव्य मिरवणूक

Share

‘कुळ, कुळ, कुळ म्हणून लढू नका, तुमच्या कुळाचे मूळ, आधार माहित आहे का? असा घणाघात जातिव्यवस्थेवर करणारे महान दास भक्तश्रेष्ठ संत कनकदास यांच्या जयंतीनिमित्त बेळगावात आज भव्य मिरवणूक काढण्यात आली.

होय, बेळगावात आज शुक्रवारी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, कन्नड आणि संस्कृती खाते यांच्या वतीने संत कनकदास जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आमदार अभय पाटील आदी मान्यवरांनी शहरातील कणबर्गी रोडवरील कनकदास चौकात संत कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून, ढोलवादन करून भव्य मिरवणुकीचे उदघाटन केले. ही भव्य मिरवणूक कनकदास चौकापासून सुरू होऊन सम्राट अशोक चौक, संगोळ्ळी रायण्णा चौकमार्गे कुमार गंधर्व रंगमंदिरात येऊन समाप्त झाली. यावेळी युवक-युवतींचा सहभाग असलेली ढोल-ताशा पथकं आणि कला पथकांनी मिरवणुकीत रंग भरला. सर्वांनी पिवळे फेटे परिधान करून, कनकदासांचा जयघोष करत मिरवणुकीत जल्लोषात सहभाग घेतला.

यावेळी आमच्या इनन्यूज=आपली मराठीशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, आजचा दिवस राज्यातील आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. आज बंगळुरू येथील विधानसौधजवळ संत कनकदासांच्या मूर्तीला पंतप्रधान मोदींनी पुष्पहार अर्पण करणे ही ऐतिहासिक घटना आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कनकदास जयंती बेळगाव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कनकदासांची तत्त्वे सर्व समाजांसाठी आदर्श आहेत. तसेच आगामी काळात बेळगावातील एका महत्त्वाच्या रस्त्याला त्यांचे नाव देऊन कनकदासांचा सन्मान करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, डीसीपी रवींद्र गडाडी, कन्नड व संस्कृती खात्याच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री, सेवानिवृत्त एसपी अशोक सदलगे व इतर मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Tags:

belagavi-kanakadas-jayanti-procession/