Gokak

जनतेने पुरोगामी विचार आत्मसात करावेत : सतीश जारकीहोळी

Share

जगात अनेक नैसर्गिक प्रक्रिया घडत असतात यापैकीच एक असलेली प्रक्रिया म्हणजे सूर्यग्रहण ! ग्रह – तारे यांच्या फेरीदरम्यान उद्भवणारे ग्रहणाचे प्रसंग हे आजच्या विज्ञान युगातही अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून पहिले जातात. यावर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया दिली असून या साऱ्या नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबतच्या अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे नागरिकांना आवाहन केले.

गोकाक येथील निवासस्थानी बोलताना सतीश जारकीहोळी यांनी राज्यातील सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील व देशातील जनता दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करत असून हि दिवाळी सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

मंगळवारी होणाऱ्या सूर्यग्रहणासंदर्भात बोलताना आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, परदेशात आपल्या देशाप्रमाणे अमावास्या आणि पौर्णिमा पाळल्या जात नाहीत. आपल्या देशात या साऱ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. अंधश्रद्धेच्या माध्यमातून घाबरविण्याचे काम केले जाते. आता नागरिकांनी स्वतःहून यात बदल करून बुद्ध, बसव, आंबेडकर, शाहू महाराज, फुले, पेरियार यांच्यासह हजारो महापुरुषांच्या पुरोगामी विचारसरणीचे अनुसरण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ग्रह आणि तारे यांच्यात होणाऱ्या अवकाशातील प्रक्रियांचा परिणाम म्हणजे ग्रहण असून हि एक नैसर्गिक प्रक्रिया असून याला घाबरण्याची गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

“भारत जोडो” पदयात्रेबाबत बोलताना ते म्हणाले, भारत जोडो यात्रेने नवा इतिहास रचला आहे. यापूर्वी गांधीजींनीही पदयात्रा केली. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनीही पदयात्रा केली. जनतेला या गोष्टीचा विसर पडला आहे. मात्र काँग्रेसने सुरु केलेल्या भारत जोडो पदयात्रेने आतापर्यंत जवळपास ३५०० अंतर पूर्ण केले असून देशातील अनेक समस्या या पदयात्रेच्या माध्यमातून जणू घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

चामराजनगर येथील गुंडलुपेठ येथे टायटल डिड वाटपदरम्यान मंत्री व्ही सोमाण्णा यांनी महिलेशी असभ्यपणे केलेल्या वर्तनाबाबत प्रतिक्रिया देताना जारकीहोळी म्हणाले, भाजपमध्ये अशा गोष्टी नवीन नाहीत. भाजप नेते सातत्याने अशा गोष्टी करतात. लवकरच याचा धडा जनता त्यांना शिकवेल, तोवर वाट पाहावी लागेल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

गोकाकमध्ये दिवाळीच्या निमित्ताने आज प्रसारमाध्यमांशी अनेक विषयांवर सतीश जारकीहोळी यांनी संवाद साधत राजकीय, सामाजिक विषयांवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

Tags:

satish jarkiholi regarding grahan