खासगी फायनान्स कंपनीने गोरगरीब शेतकरी व मजुरांचे पैसे लाटून चुना लावल्याची घटना गोकाक तालुक्यातील घटप्रभा शहरात उघडकीस आली आहे.


नवोदय फायनान्स, जगज्योती सौहार्द सहकारी संघ, सर्वज्ञ चिठ्ठीच्या नावाखाली शेतकरी, मजुरांची फसवणूक झाली आहे. सुमारे 25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ऐकिवात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या फसवणूक झालेल्या ग्राहकांनी घटप्रभा येथे फायनान्स कंपनीच्या विरोधात निदर्शने केली. तसेच संचालकांच्या घरासमोर ठिय्या मांडून, ताटे-भांडी वाजवत आणि ‘आमच्या कष्टाचे पैसे परत द्या’ अशा घोषणा देत त्यांनी आंदोलन केले.
ग्राहकांच्या विरोधाच्या भीतीने व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी घर सोडून पळ काढला आहे. संचालक मंडळाचे अध्यक्ष अण्णाप्पा हुनगुंद यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य पळून गेले आहेत. संचालक मंडळाच्या सदस्यांनी ग्राहकांच्या ठेवींच्या पैशातून अन्यत्र मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ऐकायला मिळत आहे. घटप्रभा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Recent Comments