विजयादशमी नंतर तुळजापूर येथे विशेष पालखी आणि इतर धार्मिक विधींचे आयोजन केले जाते. छत्रपती शिवरायांची कुलस्वामिनी आदिशक्ती तुळजाभवानी मंदिरात दसऱ्याच्या पाचव्यादिवशीपासून विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भाविक पदयात्रेच्या माध्यमातून तुळजापूर गाठतात. यासंदर्भातील तुळजापूर विशेष रिपोर्ट पाहुयात…

महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथील आदिशक्ती तुळजाभवानीच्या दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. कर्नाटकातील विजापूरमधील भाविक दरवर्षी पदयात्रेच्या माध्यमातून तुळजापूर गाठतात. दसऱ्याच्या पाच दिवसांनी, कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या मंदिरात विशेष पूजाविधींचे आणि पालखीचे आयोजन करण्यात येते. आकर्षक आरास, अभिषेक, पूजा असे स्वरूप या काळात देवस्थान परिसरात असते. आज तुळजाभवानीला विठ्ठल रुक्मिणी अलंकार रूपातील आरास करण्यात आली होती. यावेळी आदिशक्तीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक तुळजापूरमध्ये दाखल झालेले पाहावयास मिळाले.


पहाटे चारपासून तुळजाभवानी अभिषेक सुरु झाला असून हळदी-कुंकू, दूध, दही, तूप अशा विविध पूजा सामग्रीच्या माध्यमातून पूजेची सुरूवात झाली. अभिषेक विधीनंतर देवीला लाल साडी, हिरवा खण, सोन्याचांदीची आभूषणे घालून आकर्षक अशी आरास करण्यात आली होती. आई उदो उदो च्या गजरात भाविकांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
महाराष्ट्र राज्यातील शक्तीपीठ असलेल्या आदिशक्ती तुळजाभवानीच्या मंदिरात केवळ महाराष्ट्रच नाही तर इतर विविध राज्यातून आलेल्या भाविकांचीही सोय उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारच्यावतीने पदयात्रेच्या माध्यमातून आलेल्या भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधाही पुरविण्यात आल्या होत्या, हे विशेष.


Recent Comments