Belagavi

यंदा राज्योत्सव नियोजनपूर्वक भव्य प्रमाणात : जिल्हाधिकारी

Share

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत राज्योत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र यावेळी 1 नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सव नियोजनपूर्वक भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यात यावेळी स्वातंत्र्यदिनापेक्षाही भव्य राजोत्सव असेल असे जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी सांगितले.

जिल्हा पंचायत सभागृहात आज सोमवारी कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पूर्वतयारीच्या प्राथमिक बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राज्योत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर 1 नोव्हेंबर रोजी जिल्हा स्टेडियमवर पोलिस विभाग, एनसीसी, स्काऊट अँड गाईड्स आणि शालेय विद्यार्थ्यांच्या संचलनाचे आयोजन केले आहे. यासाठी राज्योत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे आणि कन्नड राज्योत्सवाला शोभा आणावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
जिल्हा प्रशासनासह विविध विभागांनी आपापल्या शैलीत भव्य स्वरूपाचे चित्ररथ प्रदर्शन करावे. याशिवाय कन्नड समर्थक विविध संघटना देश, भाषा आणि संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. भुवनेश्वरी देवीच्या चित्ररथाची पूजा करून मिरवणुकीचा प्रारंभ होईल. महत्त्वाच्या चेन्नम्मा चौकासह विविध मुख्य चौक आणि रस्त्यांवर ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या चित्ररथांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. ५ ज्येष्ठ पत्रकार आणि कन्नड आंदोलकांचा सन्मान करण्यात येणार आहे. डीजे, डॉल्बीमुळे लोकांना खूप त्रास होतो त्यामुळे मिरवणूक किंवा अन्य व्यासपीठावर त्याचा वापर करू नये असा कानमंत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.


उड्डाण यावेळी कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या. मुक्त वातावरणात मिरवणूक काढण्याची परवानगी द्यावी, टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे पुलाला कर्नाटक रत्न पुनीत राजकुमार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी कन्नड समर्थक संघटनांनी केली. याला उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे विभागाशी याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी राजोत्सव मिरवणुकीत आणि एकंदर शहरात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी बंदोबस्ताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळणे शक्य व्हावे यासाठी चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या संघ-संस्थांनी स्थळ, मार्ग याबाबत पोलीस खात्याला आगाऊ माहिती द्यावी असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी केले.

यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच.व्ही., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, डीसीपी रवींद्र गडादी, अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महानगरपालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, समाज कल्याण विभागाच्या सहसंचालक उमा सालीगौडर, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री तसेच जिल्हास्तरावरील विविध विभागांचे अधिकारी, कन्नड समर्थक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कन्नड समर्थक, पत्रकार उपस्थित होते.

Tags:

belgaum dc nitish patil belgaum rajyotsav meeting belgaumzp rajyotsav meeting