२८ सप्टेंबर पासून बेळगावमधील सरदार ग्राउंड वर सुरु असलेल्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगता रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. भाजप राष्ट्रीय संघटना सचिव बी एल संतोष यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात आमदार अनिल बेनके यांच्याहस्ते बी. एल. संतोष यांचा सत्कार करण्यात आला.

बेळगावमध्ये गेल्या १० दिवसांपासून सरदार्स मैदानावर सुरु असलेल्या विविध सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांची सांगता झाली. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे बी एल संतोष यांची प्रमुख उपस्थिती होती. ढोल ताशा स्पर्धेच्या माध्यमातून हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.


आमदार अनिल बेनके यांनी बी एल संतोष यांचा आत्मीयतेने सत्कार केला. यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, भाजप प्रवक्ते एम बी झिरली, चिकोडी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश नेरली आदींसह अनेक मान्यवरांनीही या कार्यक्रमास उपस्थिती होती. राज्य भाजप उपाध्यक्ष निर्मल कुमार सराणाजी यांचीही या कार्यक्रमास उपस्थिती लाभली होती.
यावेळी आयोजित ढोल ताशा स्पर्धेचा आनंद उपस्थित सर्व मान्यवरांनी घेतला.. यावेळी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले, गेल्या १० दिवसांपासून दसरा महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा – कार्यक्रमांचे आयोजन सरदार्स मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना आज पारितोषिक वितरित करण्यात आली असून यापुढील काळात देखील अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी सर्वांनी जोमाने तयारी करावी, पुढील वर्षी दसरा महोत्सवाच्या निमित्ताने असाच कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजप नेते, भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार अनिल बेनके यांचाही विविध मंडळांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


Recent Comments