बेळगावच्या सह्याद्री नगरात रहिवाशांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. वेळेत आणि समर्पक पाणीपुरवठा करावा, या मागणीचे निवेदन येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सह्याद्रीनगरमधील सारथी नगर, डी-ग्रुप कर्मचारी कॉलनी, पोलिस कॉलनी, आश्रय कॉलनी भागात चार दिवसांतून एकदा पाणी सोडले जात होते. आता ते आठ दिवसांतून एकदा सोडले जात आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे रहिवाशांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून पुरेशा पाणीपुरवठ्यासाठी निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

हिडकल धरण आणि राकसकोप्प जलाशय पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले असले तरी आमच्या वसाहतींना पाणीपुरवठ्याची कमतरता जाणवत आहे. पुरेसा पाऊस आणि जलाशय भरल्याने समर्पक पाणी पुरवठा न करता अपुरा पुरवठा केला जात आहे असे येथील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे आमच्या विनंतीला प्रतिसाद देऊन योग्य प्रकारे पाणीपुरवठा करावा. तसे न केल्यास रिकाम्या घागरी हाती घेऊन बॉक्साईट रस्ता अडवून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी बाबू टपाले, डॉ. एस. एस. जगजंपी, आर. एम. हिरेमठ, योगेश आचारी, एस. डी. कोरीशेट्टी, एम. के. तंगडी, एम. जे. मुजावर, सुशिलम्मा कांबळे, पार्वतेव्वा यादव आदी उपस्थित होते.


Recent Comments