Vijayapura

दुष्काळग्रस्त विजापुरात पावसामुळे विचित्र परिस्थिती

Share

दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजापुरात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून या पावसामुळे एकीकडे पाणीच पाणी तर दुसरीकडे अनेक निसर्गरम्य ठिकाणी हिरवळ पसरून पर्यटक आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणची देवस्थाने पाण्याखाली आली असून अशा पाण्यातदेखील भाविक पूजेसाठी गर्दी करताना दिसत आहेत.मागील ७ दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विजापूर जिल्ह्यात द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे. पाण्याचे प्रवाह ओसंडून वाहात आहेत. काहीठिकाणची पिके पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले आहे. पावसाअभावी चिंतेत असणारे शेतकरी यंदाच्या पावसाने हवालदिल झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनेक निसर्गरम्य परिसरात हिरवाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. अनेक देवस्थाने पाण्याखाली आली असून अशा पाण्यात देखील भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. येथील संगमनाथ देवस्थान पाण्याखाली आले असून या देवस्थानात भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. संगमनाथ मंदिराच्या गाभार्यात कमरेपर्यंत पाणी आले असून अशा पाण्यात देखील भाविक याठिकाणी दाखल झाले आहेत. विजापूरमधील अनेक ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करत असून विजापूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेल्या डोणी नदीचा प्रवाह देखील पात्राबाहेर वाहात आहे. नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नदीचे पाणी ओसंडून वाहून पुराचा धोका निर्माण झाला आहे. शेतजमिनीत पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले असून संततधार पावसाने शेतकऱ्यांवर संकट आले आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यात अशा पद्धतीने पाऊस पडल्याने बहुतांशी लोक पावसाचा आनंद घेत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला मुसळधार पावसामुळे अनेकांना झेलाव्या लागलेल्या नुकसानीमुळे समस्याही निर्माण झाल्या आहेत. गेल्या ५ ते ६ दिवसात विजापूर जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नसून सर्वत्र ढगाळ वातावरण दिसून येत आहे.

Tags: