शेजारील महाराष्ट्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील सीमाभागातील नद्यांच्या पाणी पातळीत क्षणाक्षणाला वाढ होत आहे. त्यामुळे महापूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटकात सीमाभागातील नद्यांचा अंतर्प्रवाह वाढला आहे. वाहून येणाऱ्या पाण्यामुळे नद्यांच्या पातळीत क्षणाक्षणाला वाढ होत आहे. जिल्ह्यातील कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहून आले आहे. त्यामुळे या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. स्थानिक पाण्याच्या वाढत्या पातळीच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी, रायबाग आणि अथणी तालुक्यातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्हा प्रशासनानेही नदीकाठच्या रहिवाशांना अलर्ट जारी केला आहे. नदीकाठच्या गावात जाऊन सरकारी अधिकारी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना ग्रामस्थांना देत आहेत. एसडीआरएफच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. पाऊस असाच पुढे सुरु राहिल्यास महापूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या ३ वर्षांपासून महापुराचा सामना करणाऱ्या नदीकाठच्या लोकांत सध्या पुन्हा पुराच्या भीतीने अस्वस्थता पसरली आहे.



Recent Comments