Belagavi

संत बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त बसवदर्शन प्रवचन

Share

उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नऊशे वर्षांचा इतिहास असलेल्या संत बसवेश्वर महाराजांच्या समाजवादी पायाभूत संकल्पनांची गरज असून यासाठी संत बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त बसव दर्शन या प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हुकेरी मठाचे सदाशिव महास्वामींनी दिली.

जागतिक लिंगायत महासभा आणि राष्ट्रीयता बसव सेना युंच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमधील शिवबसव नगर येथील आर एन शेट्टी पॉलिटेक्निक प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या विश्वगुरू बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त बसवदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

गरिबी, जाती व्यवस्था, वर्णभेद, अंधश्रद्धा अशा समाजविरोधी व्यवस्थेविरोधात चळवळ उभी करून संघर्ष करणाऱ्या संत बसवेश्वर महाराजांच्या विचारांची आज समाजात नितांत गरज आहे. बसवेश्वर महाराजांच्या विचारावर आधारित बसव दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुमारे ९०० वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेला लिंगायत धर्म अनेक कारणांमुळे सामान्यांपासून दूर राहिला आहे. यासाठी बसवेश्वर महाराजांच्या सिद्धांतानुसार प्रत्येकाला त्यांच्या विचारांचे महत्व समजावे आणि उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्वामीजी म्हणाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनूर रुद्राक्ष मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, हल्ली धर्मांध वातावरण तयार होत असून यामुळे समाजाची सौहार्दता नष्ट होत चालली आहे. हे सर्व पूर्वपदावर आणण्यासाठी आणि समाजसुधारणेसाठी संत बसवेश्वर महाराजांच्या विचारांची गरज आहे. जगात शांतता नांदावी, आत्मसंपर्पणाच्या तत्वावर प्रत्येकाने चालावे, यासाठी बसवेश्वर महाराजांच्या विचारांची आज गरज असल्याचे ते म्हणाले.

यावेळी कवलगी येथील षण्मुख शिवयोगी मठाचे वीरसिद्ध देव, आमदार अनिल बेनके, जागतिक लिंगायत महासभेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी, बसवराज सुलतानपुरी, विजय धामणेकर, ए वाय बेंडिंगेरी, एस जी सिदनाळ, राजू पद्मन्नावर, शिवानंद वाघरवाडी, सतीश चौगुला आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: