Vijayapura

पीएसआय परीक्षा घोटाळा : राज्यातील टॉपर विद्यार्थिनी सीआयडीच्या ताब्यात

Share

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरती घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला असून तपासाला वेग आला आहे. या परीक्षेसाठी कार्यरत असलेल्या लॉबीचा सीआयडी पथक शोध घेत असून तपासादरम्यान महिला विभागात टॉपर असलेल्या विजापूर येथील रचना हनुमंत मुत्तलगेरी या विद्यार्थिनीला सीआयडीने ताब्यात घेतले आहे.

राज्यातील ५४५ पीएसआय पदांसाठी झालेल्या पीएसआय परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून या सर्व बेकायदेशीर कृत्यांमणध्ये सामील असलेल्यांचा शोध सीआयडी द्वारे घेण्यात येत आहे. सीआयडी पथकाच्या तपासाचा वेग वाढला असून या तपासादरम्यान विजापूरमधील बसवण बागेवाडी येथील रचना हनुमंत मुत्तलगेरी या विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. पीएसआय परीक्षेत हैद्राबाद कर्नाटकेतर महिला विभागात सर्वोच्च स्थान पटकाविणाऱ्या रचनाला अटक करण्यात आल्यानंतर तपासाच्या सूत्राला वेग आल्याचे दिसून येत आहे.

परीक्षेत पुरविण्यात येणारी ओएमआर शीट आणि कार्बन शीट या दोन्हीमध्ये तफावत आढळल्याने रचना विरुद्ध हि कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई बेंगळुरू येथे करण्यात आली असून रचना आणि तिचा भाऊ विक्रम या दोघांमुळे सध्या मुत्तलगेरी कुटुंब चिंतेत आहे. दोनवेळा परीक्षा देऊन निवड झाली नसल्याने तिसऱ्यांदा बेंगळुरू परीक्षा केंद्रावर पीएसआय परीक्षा देण्यासाठी हजर असलेल्या आणि मुलीचे नाव असूनही मुलाचा फोटो असलेल्या हाल तिकिटाच्या माध्यमातून हि बाब निदर्शनास आली आहे. सुरुवातील तपास पथकाला हि बाब खटकली आणि याचा अधिक तपास घेत अखेरीस रचनाला कार्यालयात बोलवून खुलासा घेण्यात आला.

रचनावर करण्यात आलेल्या या कार्रवाईसंदर्भात सीआयडी पथकाला विचारणा करण्यात आल्यास अद्याप याचा तपास सुरु असून सरकार ज्या निर्णयावर येईल तो निर्णय घेण्यास आम्ही सिद्ध असल्याचे सीआयडी पथकाने स्पष्ट केले. पीएसआय परीक्षा घोटाळा प्रकरणात केवळ कलबुर्गी आणि विजापूरच नाही तर अनेक भागातील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केलाय. तपासात सर्व सत्य उघडकीस येईल, आणि न्याय देण्यात येईल, असे सीआयडी पथकाने सांगितले.

पीएसआय परीक्षा घोटाळा प्रकरणी सीआयडी पथकाच्या तपासाचा वेग वाढला असून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लवकरच लागेल, अशी शक्यता वाटत आहे.

Tags: