Gokak

गोकाक खून प्रकरणाला आणखी एक वळण! मृत मंजू मुरकभावी खुनाला बबली कुटुंबीय जबाबदार! मृताच्या नातेवाईकांना बबली कुटुंबीयांनी धमकी दिल्याचा आरोप!

Share

गोकाक मध्ये गेल्या ९ महिन्यांपूर्वी झालेल्या मंजू मुरकभावी नामक तरुणाच्या खुनात दररोज नवनवे दावे करण्यात येत असून बबली कुटुंबीयांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांसमोर देताच मृताच्या नातेवाईकांनी मात्र आपल्याला बबली कुटुंबीयांनी धमकाविल्याचे सांगत आपल्या मुलाचा खून बबली कुटुंबीयांनीच केल्याचा आरोप केलाय.

१७ जुलै २०२१ साली गोकाक येथील महांतेश नगर येथे मंजू मुरकभावी नामक तरुणाचा खून झाला होता. डोक्यात दगड घालून हल्लेखोर फरार झाले होते. या प्रकरणात गोकाक मधील सिद्दप्पा बबली आणि त्यांची मुले कृष्णा अर्जुन यांना पोलिसांनी अटक केली. जामिनावर या साऱ्यांची सुटका झाली. मात्र बबली कुटुंबीयांनी आपल्याला सीपीआय आणि कर्मचाऱ्यांनी त्रास देऊन लाच मागितल्याचा आरोप करत प्रसारमाध्यमांसमोर आपली बाजू मांडली. आपल्याकडून टप्प्याटप्प्याने १५ लाख रुपयांची लाच गोकाक सीपीआय आणि कर्मचाऱ्यांनी घेतल्याचेही बबली कुटुंबीयांनी सांगितले. लोकायुक्त, राज्य महिला आयोगाकडेही बबली कुटुंबीयांनी तक्रार केली असून आता या प्रकरणी मुरकभावी कुटुंबीयांनी बबली कुटुंबीयांनीच आपल्या मुलाचा खून केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात खास पत्रकार परिषद घेऊन हि माहिती मुरकभावी कुटुंबीयांनी दिली आहे.

मृत मंजू मुरुकभावी यांचे बंधू विठाक मुरकभावी यांनी बबली कुटूंबियांवर आरोप करत सदर प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी आपल्याला बबली कुटुंबीयांनी सांगितल्याचा आरोप केलाय. हे प्रकरण दडपण्यासाठी आपण पैसे देऊ मात्र हे प्रकरण बंद करावे, असे त्यांनी आम्हाला सुचविले. या प्रकरणी वेळोवेळी आपला अपमान करण्यात येत असून आपल्या भावाचा मोबाईल घेऊन त्यातील सर्व साक्षी पुरावे त्यांनी नष्ट केले आहेत, या प्रकरणातील खुनी आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, असा आग्रहदेखील विठ्ठल मुरकभावी यांनी केलाय.

मृत मंजू मुरकभावी यांची बहीण सिद्दू कुरी या बोलताना म्हणाल्या, माझा भाऊ बबली कुटुंबातील मुलीवर लहानपणापासून प्रेम करत होता. यासंदर्भात आपल्या परिसरातील सर्वांना माहिती आहे. पूर्व वैमनस्यातून त्यांनी आपल्या भावाचा खून केला आहे. बबली कुटुंबियांकडे आपल्या भावासाठी त्यांच्या मुलीचा हात मागावयास गेले असता त्यांनी यासाठी नकार दिला. यानंतर आपल्या भावानेही या प्रकरणातील लक्ष काढले. त्याचे लग्न दुसऱ्या मुलीशी झाले. आपल्या भावाच्या लग्नाला आत तीन वर्षे झाली होती. यादरम्यान पूर्व वैमनस्यातून त्यांनी खून केल्याचा आरोप सिद्दू कुरी यांनी केला. ()

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रेखा मुरकभावी, शंकर मुरकभावी आदी उपस्थित होते.

२०२१ मध्ये झालेल्या या खून प्रकरणाची पोहोच मुख्यमंत्री, आयजीपी, एसपी, डीआयजी स्तरापर्यंत पोहोचली आहे. या खून प्रकरणी पोलिस विभाग देखील काही प्रमाणात अडचणीत आला असून मागील २ दिवसांपूर्वी बेळगावमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोकाक पोलिसांनी आपल्याकडून लाच स्वीकारल्याचे खुलासा बबली कुटुंबीयांनी केला. यानंतर या प्रकरणाचा सखोल तपस करण्याचा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिला. आता यानंतर लागलीच मृत मंजू मुरकभावी च्या कुटुंबीयांनी नवा दावा केला असून परस्परांवर केलेल्या आरोपानंतर या प्रकरणाला कोणती कलाटणी मिळेल आणि सत्य कधी बाहेर पडेल हे पाहावे लागेल.

Tags: