COVID-19

कोविड चौथी लाट : पुन्हा मास्क वापरण्याची गरज : आरोग्यमंत्री

Share

जागतिक आरोग्य संघटनेनुसार ज्या नागरिकांनी लस घेतली नाही अशा नागरिकांमध्ये कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळून आले असून चौथ्या लाटेचा शिरकाव झाला आहे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करत दक्षता बाळगावी असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कृष्णा या गृहकार्यालयात कोविड संदर्भात मंत्री, तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. कोविडच्या चौथ्या लाटेचा शिरकाव झाला असून हळूहळू रुग्णसंख्येत वाढ होत चालल्याचे निदर्शनास आले असून मास्क न घातल्यास दंड आकारण्यात येणार नाही मात्र पूर्वखबरदारी आणि दक्षतेसाठी ज्याठिकाणी नागरिकांची वर्दळ आहे अशा ठिकाणी नागरिकांनी सक्तीने मास्क वापरावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

बेंगळुरू महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालल्याची माहिती समोर आली आहे. ज्या नागरिकांनी कोविडचा दुसरा डोस घेतला नाही अशा नागरिकांमध्ये संसर्ग अधिक आढळून आला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच तिसरा डोस घेतलेल्या नागरिकांचीही संख्या कमी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. कोविडकडे दुर्लक्ष न करता तातडीने लस घेण्यात यावी, ६० वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देण्यात येत असून प्रत्येकाने लस घेऊन लसीकरणासंदर्भात जागृती करावी, असे आवाहन देखील आरोग्यमंत्र्यांनी केले.

दक्षिण कोरिया, थायलंड, जपान यासह अनेक ठिकाणाहून नागरिक बंगळूरमध्ये दाखल होत आहेत. अशा प्रवाशांवर बारीक नजर ठेवण्यात येत असून आरोग्य संघटनेकडून जोवर कोविड संदर्भातील अधिक माहिती उपलब्ध होत नाही तोवर कोणत्याही गोष्टी सांगणे शक्य नसल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

कोविडचा कहर संपला असल्याची चिन्हे जरी दिसत असली तरी कोविड च्या चौथ्या लाटेची टांगती तलवार मात्र अद्यापही कायम आहे. आधीच्या कोविड लाटेमध्ये नागरिकांचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून आता नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून मास्क वापरून खबरदारीसह राहणे आवश्यक आहे.

Tags: