Belagavi

शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार

Share

जिल्हा प्रशासन, कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघ जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्षातील राज्य सरकारी कर्मचारी दिन तसेच सर्वोत्तम सेवा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले, विद्यार्थी पेन्शन, अपंग पेन्शन अशा योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरु आहे. यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांना बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यांना हवे असलेले सहकार्य देण्यास सरकार प्रयत्नशील आहे. याचप्रमाणे रस्तेविकास, स्मशान निर्मिती, एससीएसटी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच विद्यार्थी पेन्शन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

यावेळी राज्य सरकारी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश पाटील म्हणाले, सरकारी प्रकल्प जनतेपर्यंत पोहोचवण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाची माहिती आहे. आज राज्य सरकारी कर्मचारी दिनाचे आचरण करण्यात येत असून हा दिन साजरा करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. केंद्र सरकारदेखील केंद्र सरकारी कर्मचारी दिनाचे आयोजन करत आहेत. यावेळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना समान वेतन, नवीन पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजना द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

विधान परिषद सदस्य हनुमंत निराणी यांनी आपले मनोगत व्यक्त सांगितले, सरकारी विभागात सुमारे १ लाख पदे रिक्त आहेत. या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. अनेक पालक आपल्या मुलांना सरकारी नोकरी मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत आहेत. सरकारी पदांवर सरकारी कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा पुरविल्यास राज्याच्या विकासाला हातभार लागेल, असे निराणी म्हणाले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही, उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके आदींसह तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: