विकेंड कर्फ्यू रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र नाईट कर्फ्यू कायम राहणार आहे. केवळ बेंगळूरमध्ये २९ जानेवारीपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार असून राज्यातील इतर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये सुरु ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली बेंगळूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कृष्णा या गृहकचेरीत झालेल्या महत्वपूर्ण कोविड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे २ तासांहून अधिक काळ सुरु असलेल्या या बैठकीत तज्ज्ञ, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी सभा समारंभ, मोठे कार्यक्रम या साऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. विकेंड कर्फ्यू हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असून बेंगळूरमध्ये आलेल्या परदेशातील नागरिकांवर कडक निगराणी ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
लसीकरण कार्यक्रम अधिक तीव्र करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला असून बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महसूल मंत्री आर अशोक यांनी उद्यापासून राज्यभरातील विकेंड कर्फ्यू रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. कोणत्याही आमदार अथवा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार कर्फ्यू रद्द करण्यात आला नसून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा कर्फ्यू रद्द करण्यात आल्याचे आर अशोक यांनी स्पष्ट केले. मात्र राज्यात रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत नाईट कर्फ्यू नुसार संचारबंदी सुरू राहणार आहे. हॉस्पिटलायझेशनची संख्या वाढल्यास वीकेंड कर्फ्यू अपरिहार्य आहे. वीकेंड कर्फ्यू वगळता सर्व कोविड नियम नेहमीप्रमाणे जारी असल्याचे आर अशोक यांनी स्पष्ट केले.
आर अशोक पुढे म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या ५टक्के इतकी आहे. सर्व तज्ज्ञांचा अभिप्राय घेऊन नियमावली ठरविण्यात आली आहे. विकेंड कर्फ्यू रद्द करण्यासाठीही तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला असून पार्टी, बारमधील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाईट कर्फ्यू जारी ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे आर अशोक म्हणाले.
यानंतर शिक्षण मंत्री बी सी नागेश बोलताना म्हणाले, बेंगळूर वगळता सर्व जिल्ह्यातील शाळा सुरु राहणार आहेत. मुलांमध्ये कोविड लक्षणे आढळून आल्यास आणि अधिक रुग्णसंख्या निदर्शनास आल्यास शाळा बंद करण्याचा विचार करण्यात येईल. संसर्ग वाढल्यास तीन ते ७ दिवसापर्यंत शाळा बंद ठेवण्यात येतील. मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आढळून आल्यास किंवा २५ ते ३० मुलांना संसर्ग झाल्याचे आढळून आल्यास ७ दिवसांसाठी शाळा संबंधित बंद करण्यात येईल. मुलांच्याही कोविड टेस्ट करण्यात येत असून सरासरी ५ टक्के मुलांमध्ये संसर्ग आढळून आल्याचे बी सी नागेश यांनी स्पष्ट केले.
राज्यभरात लागू करण्यात आलेला विकेंड कर्फ्यू आज झालेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर रद्द करण्यात आला आहे. मात्र नाईट कर्फ्यू हटविण्यात आला नसून कोविड परिस्थितीवर आधारित या कर्फ्यूच विचार करण्यात येणार आहे. कोविड रुग्णांची संख्या अधिक आढळून आल्यास मात्र पुन्हा विकेंड कर्फ्यूची परिस्थिती ओढवू शकते असे शासनाने स्पष्ट केले आहे.


Recent Comments