COVID-19

जिल्ह्यातील शाळा पूर्ववत सुरु; मात्र पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

Share

आजपासून बेळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा पुन्हा पूर्ववत सुरु झाल्या असून कोरोनाच्या भीतीमुळे पालक मात्र चिंतेच्या छायेखाली आले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे टार्गेट हे मुलांचे असल्याची भीती वर्तविण्यात आली असून या पार्श्वभूमीवर पालकांच्या मनात घालमेल सुरु आहे…. मात्र मुलांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आल्यास घाबरण्याची गरज नसून सरकारी मार्गसूचीनुसार प्रत्येकाने लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी केले.

होय…. तिसऱ्या लाटेचे टार्गेट लहान मुले आहेत… जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिकाधिक वाढत चालली आहे. मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी १८ जानेवारी पर्यंत शाळा बंद करण्याचा आदेश दिला होता. परंतु पुन्हा १७ जानेवारीपासून शाळा पूर्ववत सुरु करण्याचा आदेश देण्यात आला. आजपासून संपूर्ण जिल्ह्यात शाळा पूर्ववत सुरु झाल्या आहेत. मात्र पालकांमध्ये आपल्या मुलांची चिंता वाढत चालली आहे.

मागील पंधरवड्यात कित्तूर येथील सैनिक वसतिगृहात अचानक कोरोना बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याची माहिती समोर आली. निपाणी खासगी पदवीपूर्व महाविद्यालयातदेखील विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाल्याची माहिती आली. बेळगावमधील एका खाजगी शाळेतील कर्मचाऱ्याला तसेच एका विद्यार्थ्यांलाही कोविडची बाधा झाली. जिल्ह्यातील एकूण ३५० हुन अधिक विद्यार्थी आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आजपासून जिल्ह्यातील पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग पूर्ववत सुरु झाले असून याची धास्ती विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे.

यासंदर्भात जिल्हा वैद्याधिकारी शशिकांत मुन्याळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुलांमध्ये कोविड अधिक आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. १८-२० टक्के मुलांना कोविडची बाधा झाली असून जिल्ह्यात सध्या ३२४ कोरोनाबाधित मुलांची नोंद झाली आहे. तिसऱ्या लाटेत कोरोना बाधित झालेल्या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आली नसल्याचे मुन्याळ म्हणाले. ५२ कोरोनाबाधित सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुलांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आल्यास घाबरण्याची गरज नसून सरकारी मार्गसूचीनुसार प्रत्येकाने लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी केले.

लसीकरणाचा मोठा टप्पा भारताने जरी गाठला असला तरी अद्याप अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. दिवसागणिक पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून अशातच शाळा देखील सुरु ठेवण्यात आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या साऱ्या परिस्थितीचा विचार करून प्रत्येकाने आपले लसीकरण आवर्जून पूर्ण करावे, तसेच कोविड बाधा झाल्यास न घाबरता योग्य वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन डॉ. शशिकांत मुनियाळ यांनी केले.

Tags: