COVID-19

पंतप्रधानांची आज मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाबाबत बैठक

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज, गुरुवारी संध्याकाळी 4:30 वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोविड-19 च्या स्थितीवर व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून बैठक होणार आहे.

यापूर्वी रविवारी पंतप्रधानांनी कोरोनाच्या स्थितीविषयी आपत्कालिन बैठक बोलावली होती. या बैठकीत, पंतप्रधानांनी जिल्हा स्तरावर आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सुविधांची खात्री करण्याच्या गरजेवर भर दिला. मोदींनी राज्यांमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचेही सांगितले होते.

सध्या देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यासोबतच ओमीक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक बोलावली आहे. आता या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये देशभरात पुन्हा लॉकडाउन लागणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

देशात बुधवारचा दिवस कोरोना व्हायरसच्या हिशोबाने खूप भयावह राहिला. बुधवारी 2 लाख 45 हजार 525 नवीन कोरोना संक्रमित आढळले. 84,479 लोक बरे झाले तर 379 लोकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे ऍक्टिव्ह केस म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1 लाख 61 हजार 721 ची वाढ नोंदवण्यात आली. सध्या देशात 11.11 लाख ऍक्टिव्ह केस आहेत. तिसऱ्या लाटेत ऍक्टिव्ह केसचा आकडा पहिल्यांदा 11 लाखांच्या पार गेला आहे.

Tags: