COVID-19

13 मंत्री, 70 आमदारांना कोरोना; महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द

Share

उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील १३ मंत्री आणि राज्यातील ७० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याने बुधवारी होणारी नियोजित साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठक रद्द झाली असली तरी राज्यासाठीचे नवे निर्बंध आज जाहीर होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यासंदर्भात सकाळी उपमुख्यमंत्री कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत जी चर्चा होईल त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने निर्णय होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यातील पहिली ते आठवी शाळा ३० जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तर राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची किंवा कसे, याबाबत बुधवारी सायंकाळपर्यंत निर्णय जाहीर करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

दर बुधवारी किंवा गुरुवारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक होत असते. कोरोना संसर्गापासून ही बैठक मंत्रालयाऐवजी मलबार हिल येथील सह्याद्री अतिथिगृहात होत होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे हजेरी लावतात. त्यानुसार बुधवारी ( ५ जानेवारी) बैठकीचे नियोजन होते. मात्र मंत्रिमंडळातील १३ सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याने मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आल्याचे निरोप मंगळवारी दुपारी मंत्र्यांच्या खासगी सचिवांना देण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीदिवशी बहुतांश आमदार आपली कामे घेऊन मंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात येत असतात. कार्यकर्त्यांची व कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते.

७० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करत मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्याचा निर्णय झाला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आदी मंत्र्यांना कोरोना संसर्ग झाला आहे.

Tags: