बेळगावातील सुवर्णसौधमध्ये विधिमंडळ अधिवेशन सुरु असतानाच छत्रपती शिवराय, संगोळ्ळी रायण्णा पुतळा विटंबना आणि त्यानंतर दगडफेकीसह उमटलेले हिंसक प्रतिसाद याचा ठपका ठेवत बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची बदली करण्यात आली आहे.

होय, बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची सरकारने बदली केली आहे. त्यांच्याजागी डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची नियुक्ती केल्याचा आदेश गृहखात्याने जारी केला आहे. बेळगावात सुवर्णसौधमध्ये झालेल्या अधिवेशन काळातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बेंगळुरातील पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्याचे संतप्त पडसाद बेळगावात उमटले होते. समाजकंटकांनी दगडफेक करून सरकारी व खासगी वाहनांना लक्ष्य केले होते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने त्याचेही तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणी पोलिसांनी ३८ जणांना अटक केली होती. मात्र या सगळ्याला पोलिसांचे अपयशच कारणीभूत असल्याचा आरोप भाजप आ. अभय पाटील यांनी अधिवेशनात केला होता. त्यामुळेच पोलीस आयुक्त त्यागराजन यांच्यावर गंडांतर आल्याचे बोलले जात आहे. नवे पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी यापूर्वी उडुपी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदासह अनेक हुद्यांवर काम केले आहे. त्यागराजन यांची बेंगळूर येथे डीआयजी पदावर बदली करण्यात आली आहे.


Recent Comments