COVID-19

घाबरू नका; प्रतिबंधक उपाय मात्र करा : तज्ज्ञ डॉ. देवीप्रसाद शेट्टी

Share

कोणत्याही विषाणूच्या संरचनेत बदल घडून येतच असतात. ते कोणाला थांबविता येत नाहीत. ओमायक्रॉन विषाणू अधिक वेगाने पसरण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे घाबरून जाऊ नये. प्रतिबंधक उपाय मात्र योजण्याची गरज आहे असे प्रसिद्ध कोरोना अभ्यासक तज्ज्ञ डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांनी सांगितले.

परदेशांत कोरोनाचा नवा ओमायक्रॉन विषाणू आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना डॉ. शेट्टी म्हणाले, सुमारे १५-२० देशांत ओमायक्रॉन विषाणू आढळला आहे. हा धोका भारतालाही टळलेला नाही. तो भारतातही येणारच. लोक चिंता करताहेत तितका तो अपायकारी नाही. पण म्हणून त्याला साधा समजूनही चालणार नाही. आवश्यक खबरदारी घेतलीच पाहिजे. ओमायक्रॉनमुळे फार मोठे नुकसान होणार नाही असा अंदाज व्यक्त करून, विषाणूच्या बदल होत असतातच. बाधित व्यक्ती मरण पावला तरच विषाणू संपतो. त्यामुळे त्याची लागण होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे डॉ. शेट्टी यांनी सांगितले.

लस कोविडपासून नव्हे तर लागण झाल्यास होणाऱ्या मृत्यूपासून वाचवते. त्यामुळे ज्यांनी अद्याप दुसरा डोस लस घेतलेली नाही त्यांनी ती लागलीच घ्यावी. नंतर कोविड संसर्ग वाढल्यावर दुसरा डोस घेण्यासाठी धावाधाव करू नका. सर्वांनी फेसमास्क वापरा, सामाजिक अंतर पाळा, संसर्गाची लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्या असे आवाहन डॉ. शेट्टी यांनी जनतेला केले.

त्याचप्रमाणे सरकार बूस्टर डोस देण्यासाठी पुढे आले आहे. त्यामुळे वाद घालत न बसता बूस्टर डोस घ्यावा, कोरोना प्रतिबंधक लस हा वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार आहे. अमेरिका, युरोपमध्ये ज्यांनी लस घेतली नाही असे लोक बहुतेक आयसीयूत आहेत. वाद घालत ज्यांनी लस घेण्यास नकार दिला तेच आयसीयूमध्ये दिसताहेत. त्यामुळे सर्वानी वाद न घालता सक्तीने लस घ्यावी असा सल्ला डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांनी यावेळी दिला.

एकंदर, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी लस घ्यावी, मास्क, सामाजिक अंतर यासारखे प्रतिबंधक उपाय करावेत असा सल्ला डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांनी जनतेला दिला आहे.

 

 

Tags: