Gokak

‘काळ आला होता पण… १४० फुटांवरून कोसळूनही तो बचावला !

Share

 ‘देव तारी त्याला कोण मारीअसे म्हणतात. आयुष्याची दोरी बळकट असली की, मृत्यूही मागे हटतो. याचाच प्रत्यय आणून देणारी घटना बेळगाव जिल्ह्यातील गोकाक फॉल्स धबधब्याजवळ शनिवारी रात्री उशिरा घडली.

होय, ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असे म्हणता येईल अशी थरारक घटना शनिवारी रात्री उशिरा गोकाक फॉल्स येथे घडली. सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून तब्बल १४० फूट उंचावरून खाली कोसळूनही एक युवक आश्चर्यकारकरित्या बचावला. कलबुर्गी जिल्ह्यातील जेवरगी गावचा रहिवासी असलेला प्रदीप सागर नामक युवक बेळगावात एचडीएफसी बँकेत कमला आहे. तो व त्याचे मित्र गोकाक फॉल्स पाहण्यासाठी शनिवारी सायंकाळी गेले होते. त्यावेळी सेल्फी काढताना त्याचा तोल जाऊन तो तब्बल १४० फूट उंचावरून घसरून खाली पडला. त्याच्या मित्रांनी तातडीने गोकाक पोलीस आणि अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी आले.

पण प्रदीपचं शोध लागत नव्हता. १४० फुटांवरून खाली पडलेला प्रदीप खंदकामध्ये अडकून पडला होता. त्याची शुद्ध हरपली होती. त्यामुळे त्याला कॉल केल्यावर तो प्रतिसाद देत नव्हता. रात्रभर खंदकात दगडामध्ये अडकून पडलेल्या प्रदीपला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास शुद्ध आली. नंतर त्याने मित्रांना फोन करून, ‘मी दगडांत अडकून पडलो आहे, मला वाचवा’ असा निरोप दिला. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रदीपचं शोध लावण्यात यश मिळवले. त्याला उपचारांसाठी गोकाकच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणाची नोंद गोकाक शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. एकूणच काय तर ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असा अनुभव प्रदीप सागर या युवकाला आला आहे.

 

 

 

Tags: