बेळगाव तालुक्यातील मच्छे व अन्य खेड्यांत दर्जेदार इंद्रायणी भात आणि चवदार मसूरच्या उत्पादन शेतकरी अनेक वर्षांपासून घेत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही कारणासाठी या भागातील सुपीक जमिनीचे संपादन करू नये अशी मागणी शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली.

होय, शनिवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धरणे धरलेल्या शेतकऱ्यांची समजूत काढून आंदोलन मागे घ्यायला लावण्यात मुख्यमंत्री बोम्मई यशस्वी ठरले होते. मात्र रविवारी सकाळी मुख्यमंत्र्यांना सर्किट हाऊस समोर शेतकरी आंदोलनाचे चटके बसलेच. मुख्यमंत्र्यांना भेटू दिले जात नसल्याच्या निषेधार्थ नेगीलयोगी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अनेक शेतकरी नेते बासमती, इंद्रायणी भाताच्या लोम्ब्या आणि चणीची रोपे घेऊन आले होते. त्यांना सर्किट हाऊसच्या प्रवेशद्वारातच पोलिसांनी अडविले. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. मच्छे गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ च्या रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन संपादित करू नये अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली. त्यांनी मच्छे भागात पिकणाऱ्या बासमती, इंद्रायणी भाताच्या लोम्ब्या आणि चणीची रोपे मुख्यमंत्र्यांना दाखवली. अशी दर्जेदार पिके देणारी सुपीक जमीन कोणत्याही कारणास्तव ताब्यात घेऊ नये अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर बोम्मई यांनी, बेंगळूरला गेल्यावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. यावेळी चिक्कोडीचे खा. अण्णासाहेब जोल्ले, आ. दुर्योधन ऐहोळे, शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी, प्रकाश नाईक आदी उपस्थित होते.
Recent Comments