Belagavi

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन

Share

विविध मागण्यांच्या पूर्ततेचा आग्रह धरत बेळगावमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहाय्यकांनी आंदोलन छेडले. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीआयटीयू संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.

अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहाय्यिकांनी सीआयटीयू संघटनेच्या नेतृत्वाखाली आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन छेडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडत आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

आतापर्यंत सरकार सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करेल असे सांगत आले आहे. अंगणवाडी मध्ये देण्यात येणारा आहार देखील बंद करण्यात आला आहे. अंगणवाडी केंद्र बंद करण्यासंदर्भात चर्चा देखील सुरु आहे. कोविड काळात जवळपास ६० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी केवळ पाच ते सहा कुटुंबांना केवळ ३० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कोणतीही नुकसानभरपाई अद्याप देण्यात आली नाही. खासगीकरण धोरण अवलंबण्याचा विचार सोडून देण्यात यावा, अन्यथा पुढील काळात चलो विधानसौध, चलो दिल्ली सारखी आंदोलने हाती घेऊन तीव्र निषेध करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना जिल्हा कार्यदर्शी संध्या कुलकर्णी म्हणाल्या, अनेकवेळा आमच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांच्याकडे निवेदने देण्यात आली आहेत. परंतु आतापर्यंत आमच्या मागण्यांचा विचार कोणीही केला नाही. केंद्र आणि राज्य सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आपण तीव्र निषेध व्यक्त करत आहोत, असे त्या म्हणाल्या.

या आंदोलनात शेकडो अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहाय्यिका सहभागी झाल्या होत्या.

Tags: