COVID-19

१८ महिन्यानंतर चिमुकल्यांचे फुले देऊन शाळेत स्वागत

Share

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दहशतीखालीच राज्यात आजपासून शाळा गजबजल्या. हुक्केरी तालुक्यात हल्लोळी गावच्या शाळा सुधारणा समिती आणि ग्रा. पं. सदस्यांनी शिक्षकांनी तब्बल १८ महिन्यानंतर शाळेत परतलेल्या चिमुकल्यांचे फुले देऊन शाळेत स्वागत केले

यासंदर्भात मुख्याध्यापक जे. एस. चौगुले यांनी सांगितले की, सरकारचा आदेश आणि सूचनेनुसार शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. मुलांना घरातूनच जेवणाचा डबा आणि गरम पाणी आणण्यास सांगितले आहे. शाळेत, आवारात सामाजिक अंतर राखले जाईल याची खबरदारी घेण्यात येत आहे. मुले आनंदाने शाळेत येत आहेत. कोविडचा सामना करतानाच मुलांचे भविष्यही घडविले पाहिजे या दृष्टीने शाळा भरविण्यात येत आहेत असे ते म्हणाले. ग्रा. पं. विकास अधिकारी एम. एम. हिरेमठ म्हणाले, मुलांच्या सुरक्षिततेसाठी कोविड मार्गसूचीचे काटेकोर पालन करून शाळा भरविण्यात येत आहे. त्यामुळे पालकांनी न घाबरता मुलांना शाळेला पाठवावे असे आवाहन केले.

विद्यार्थिनी रंजना तंगडी हिने शाळा सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करताना आम्हाला अडचणी येत होत्या. आता शाळा सुरु झाल्याने आमच्या मित्र-मैत्रिणींसह एकत्र बसून शिक्षकांनी शिकवलेले पाठ प्रत्यक्ष ऐकून अभ्यास करण्यात आता मजा येईल अशी भावना तिने व्यक्त केली.

यावेळी एसडीएमसी सदस्य मारुती हंचनाळे, रामप्पा दिन्नीमनी, ग्रा. पं. सचिव एम. वाय. हजारे, बी. ए. कोणकेरी आणि शिक्षक, पालक उपस्थित होते.

 

 

 

Tags: