Belagavi

२२ एप्रिलपासून शिंदोळी येथे श्री महालक्ष्मी यात्रा

Share

याच महिन्याच्या एप्रिल २२ ते ३० दरम्यान बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावातील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी, श्री दुर्गादेवी आणि श्री मसनाई देवी यात्रोत्सव पार पडणार असल्याचे ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश शहापूरकर यांनी सांगितले.

ते आज बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. १५ वर्षांतून एकदा पार पडणारा शिंदोळी ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा यात्रा महोत्सव एप्रिल २२ पासून ९ दिवस चालणार आहे. एप्रिल २२ रोजी बड्डेकोळ मठाचे श्री नागय्य स्वामी आणि शगणमट्टी गावचे श्री रुद्रमुनी महास्वामी यांच्या उपस्थितीत खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

एप्रिल २४ पासून ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. एप्रिल २५ रोजी विविध वाद्यांच्या गजरात रथोत्सव होईल. कारंजी मठाचे श्री गुरुसिद्धस्वामीजी आणि हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्याउपस्थितीत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टिहोळी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे.

एप्रिल २५ ते २८ दरम्यान दररोज उओटी भरण्याचे कार्यक्रम, २८ रोजी जंगी कुस्ती आणि एप्रिल २९ रोजी भजन, ढोल-वादन, नाटक, मनोरंजन, आरोग्य तपासणी शिबिर यासारखे विविध कार्यक्रम होणार आहेत. यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवनगौड पाटील, बाबागौड पाटील, ए. ए. सनदी, पीराजी अनगोळकर, लक्ष्मण, राकेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: