Belagavi

कृष्णा नदीकाठच्या समस्यांसाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा – आम. राजू कागे

Share

कृष्णा नदीकाठच्या पुनर्वसनासह कृषी, आरोग्य आणि शिक्षण समस्यांवर ठोस पावले उचलावीत, अशी मागणी कागवाडचे आमदार राजू कागे यांनी विधानसभेत केली आहे.

विधानसभेत उत्तर कर्नाटकशी संबंधित चर्चेत कागवाडचे आमदार राजू कागे यांनी कृष्णा नदी पात्रातील नागरिकांना दरवर्षी पुनःपुन्हा स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्यांचा सामना करावा लागत असल्याकडे लक्ष वेधले. प्रत्येक वर्षी नदीला महापुर आला की, प्रशासन फक्त गंज केंद्रे सुरू करते आणि अधिकारी भेट देतात. त्यामुळे लोकांना व सरकारलाही त्रास होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी त्यांनी मागणी केली.

त्यांनी सांगितले की, आलमट्टी आणि हिप्परगी परिसरातील नागरिकांना पुनर्वसन योजनेअंतर्गत काही प्रमाणात मदत देण्यात आली आहे, परंतु अजूनही अनेक गावांतील लोक वंचित आहेत. कागवाड मतदारसंघातील जुगूळ आणि मंगावती या गावांनाही पुराचा फटका बसतो. मुख्यमंत्री यांनी नुकतीच या गावांना भेट दिली होती. त्यामुळे या गावांसाठी निधी मंजूर करून त्यांचे स्थलांतर तातडीने करावे, तसेच महापुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांची उन्नती करावी, असे कागे यांनी स्पष्ट केले.

कृषी समस्यांकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, कृष्णा नदीकाठच्या सुपीक जमिनींवर नद्यांच्या पुरामुळे गाळ साचतो, त्यामुळे शेतीला अडथळा निर्माण होतो. या भागासाठी विशेष अनुदान देऊन कृषी विभागाच्या मदतीने पाइपलाइन सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत त्यांनी सरकारी शाळांसाठी नवीन इमारती, शिक्षक भरती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी केली. कागवाड भागात मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष निधी मंजूर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बसवेश्वर उपसा सिंचन योजनेबाबत त्यांनी सांगितले की, ही योजना अंतिम टप्प्यात आहे. मात्र, ३०० कोटी रुपयांच्या निधीची तातडीने आवश्यकता आहे. सरकारने हा निधी लवकरात लवकर मंजूर करावा, असे कागे यांनी आग्रह धरला. कृषी सिंचनावर भर देत त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी सामूहिक पाणी पुरवठा योजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी २०० टन क्षमतेचे मोटार पंप बसवले जात आहेत.

सरकारने यावर “शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली. कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना पुनर्वसन आणि मूलभूत सुविधांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. कृष्णा नदी पुरामुळे दरवर्षी स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा, तसेच कृषी, शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार राजू कागे यांनी विधानसभेत केली.

Tags: