Belagavi

सत्तेपेक्षा समाजाचे हित महत्त्वाचे ! पंचमसाली लिंगायत समाज आंदोलनात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतला सहभाग

Share

पंचमसाली आरक्षण लढ्यात मी सदैव समाजाच्या बाजूने उभी राहीन. सत्तेपेक्षा समाजाचे हित महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

कुडल संगम पंचमसाली पिठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण सौधसमोर आयोजित लिंगायत पंचमसाली समाजाच्या २ए आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात व वकिलांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मंत्री महोदयांनी समाजाला न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.

समाज असेल तर आपण सगळेच आहोत. पंचमसाली समाजातील अनेक लोक कष्टात जगत आहेत. समाजाला न्याय मिळाला पाहिजे. याविषयी मी आधीदेखील मुद्दा उपस्थित केला आहे. आज देखील याच विषयावर मुद्दा मांडणार असून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आपल्या समाजाच्या लढ्याची बाब आणून देण्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या.

पंचमसाली समाजाची मुलगी म्हणून मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा आहे. आरक्षणाची बाब आम्ही वारंवार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. समाज सांगेल त्या दिशेने मीही वाटचाल करत असून 2अ आरक्षणाचा नक्कीच विजय होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री ए.बी.पाटील, शशिकांत नाईक, आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, अरविंद बेल्लद, सी.सी.पाटील, शशिकला जोल्ले, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, डॉ.महांतेश कडाडी, माजी आमदार व्ही.आय.पाटील, महांतेश मत्तीकोप्प आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा, के. व्यंकटेश, डॉ. एम. सी. सुधाकर यांच्यासह मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी भेट दिली आणि बसवजय मृत्युंजय स्वामीजी आणि आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेतल्या.

 

Tags: