राज्य ग्राहक आयोगाच्या पीठाची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या आनंदात आज बेळगावमधील वकिलांनी विजयोत्सव साजरा केला. ग्राहक हक्कांसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार असल्याचे वकिलांनी सांगितले.
बेळगाव जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. किवडसण्णावर यांनी सांगितले की, कर्नाटक राज्य ग्राहक वाद निवाडा आयोगाची स्थापना करण्याची मंजुरी १९७० मध्येच मिळाली होती, पण जागेच्या अभावामुळे स्थापना होऊ शकली नव्हती. मात्र, बेलगाव जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली. के. एच. पाटील सभागृहात भाडेतत्त्वावर ग्राहक पीठ सुरू होणार आहे, असे ते म्हणाले.
ऍड एन. आर. लातूर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, बेळगावमध्ये ग्राहक आयोगाचे खंडपीठ सुरू होणार आहे, ही आनंदाची बातमी आहे. मागील अधिवेशनात यासाठी पाच दिवसांचे धरणे आंदोलन झाले होते. अखेर याला यश आले असून, कर्नाटक भागातील नऊ जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे.
या आनंदोत्सवात अनेक वकील सहभागी झाले होते. ग्राहकांच्या हक्कांसाठी सरकारने उचललेले हे पाऊल उपयुक्त ठरेल, असा विश्वास वकिलांनी व्यक्त केला.


Recent Comments