Belagavi

भारत विकास परिषदेच्यावतीने “ॲनिमिया” व्याख्यान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Share

भारत विकास परिषदेच्या “ॲनिमिया मुक्त भारत” या राष्ट्रव्यापी आरोग्य अभियानांतर्गत बेळगाव शाखेतर्फे मंगळवारी ॲनिमियावर विशेष व्याख्यान तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. नीता देशपांडे तसेच गौरवान्वित अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. अरूण जोशी उपस्थित होते. सेंट्रा केअर हॉस्पिटलच्या सहयोगाने हा स्तुत्य उपक्रम येथील एस. बी. पाटील शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात राबविण्यात आला. यावेळी 125 जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पांडुरंग नायक यांनी अतिथिंची ओळख करून दिली. विनायक मोरे यांच्या हस्ते डॉ. नीता देशपांडे यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. नीता देशपांडे म्हणाल्या, रक्तात लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याने ॲनिमिया होतो. आहाराकडे नीट लक्ष न दिल्याने हा आजार होतो. आयर्न आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. शरीरात आयर्नच्या कमतरतेमुळे ॲनिमियासारखी गंभीर समस्या होऊ शकते. लोह, व्हिटॅमिनची कमतरता आणि क्रॉनिक आजारांमुळे ॲनिमिया होतो.
थकवा, कमजोरी, श्वास घेण्यास समस्या, पिवळी त्वचा, हृदयाचे ठोके नियमित नसणे, चक्कर येणे, छातीमध्ये वेदना, पाय आणि हात थंड पडणे, सतत डोकेदुखी ही ॲनिमियाची लक्षणे आहेत. यासाठी पौष्टिक आहार घेणं महत्वाचं आहे. आयर्न असलेले पौष्टिक धान्य, हिरव्या पालेभाज्या आणि ड्रायफ्रुट्स आहारात घ्यावे, असे डॉ. नीता देशपांडे यांनी सांगितले.
डॉ. अरूण जोशी म्हणाले, माणसाचे आरोग्य उत्तम असेल तर तो आयुष्यात काहीही करु शकतो. पोषक आहार तुमचे आरोग्य चांगले ठेवतो. आरोग्य उत्तम राहायला दररोज वेळेवर झोपणे, व्यायाम करणे, योग्य प्रमाणात चालणे या गोष्टी पण फायदेशीर ठरतात. मनाचं आरोग्य बिघडलं तर शरीराचं बिघडतं. त्यासाठी सतत हसत आनंदी रहा.
प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. यावेळी व्ही. एन्. जोशी, विनायक घोडेकर, कॅप्टन प्राणेश कुलकर्णी, चंद्रशेखर इटी, पी. जे. घाडी, शशिधर हिरेमठ, शानभाग, विनायक ताम्हणकर, जया नायक, रजनी गुर्जर, विद्या इटी, ज्योती प्रभू, रूपा कुलकर्णी, सपना मक्कन्नवर, सुचेता जोडत्ती, रतन अडिके आदि तसेच सेंट्रा केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags: