कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या ऐतिहासिक विजयोत्सवाच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त यंदा बेळगावसह संपूर्ण देशभरात कित्तूरचा इतिहास पोहोचवण्यासाठी कित्तूर उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जात असल्याची प्रतिक्रिया जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.
बेळगाव शहरातील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कित्तूर महोत्सवानिमित्त बेळगावात प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कित्तूर चन्नम्मा यांचा इतिहास बेळगावसह देशभर पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कित्तूरचे वैभव जगभर पोहोचावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात जनतेने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कित्तूरचा इतिहास सर्वदूर पोहोचवावा असे आवाहन केले.
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, आपल्या देशाचा चमकणारा तारा आणि महिला शक्ती असलेल्या चन्नम्मा यांच्याबद्दल अभिमान व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे. राणी चन्नम्मा भारतातील इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढणारी पहिली वीर महिला होती. कित्तूर राणी चन्नम्मा उत्सव उत्तर कर्नाटकातील लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
हा उत्सव पुढील तीन दिवस चालणार असून राणी चन्नम्मा यांचा इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी व्यक्त केली.
यावेळी साधू कोकिळा यांच्यासह राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध कलाकारांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, विधान परिषद सदस्य चन्नराजा हट्टीहोळी, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भीमा शंकर गुळेद, ग्रा.पं. सीईओ राहुल शिंदे, बेळगाव विभागीय अधिकारी श्रावण नायक, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग उपसंचालिका विद्यावती भजंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
Recent Comments