बेळगाव विमानतळाला जोडणाऱ्या रस्त्यालगतचा निवासी भाग असणाऱ्या मारुतीनगर मध्ये मूलभूत सुविधांअभावी नागरिकांचे हाल होत असून काल झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील रहिवाशांच्या घराघरात पाणी शिरले आहे.
परतीच्या पावसाने शहर – परिसरासह सर्वत्रच धुमाकूळ घातला असून बेळगावमधील मारुतीनगर येथील नागरिकांना या पावसामुळे फटका बसला आहे. याठिकाणी सुविधा पुरविण्यात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील सखल भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नाराज झालेले नागरीक अधिकाऱ्यांना शिव्याशाप देत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन आमचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती करत आहेत.
काल झालेल्या पावसामुळे येथील घराघरात पाणी शिरले असून हे पाणी बाहेर काढण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरु आहे. अपंग, महिला, अबालवृद्धांसह या समस्येमुळे प्रत्येकाचेच हाल झाले असून याठिकाणी सुविधांची वानवा निर्माण होण्यास अधिकारी वर्गच जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मारुती नगर दुसरा क्रॉस येथील हि दृश्ये असून सांडपाणी आणि ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी घरांमध्ये शिरून मोठी समस्या निर्माण झाली आहे.
गेल्या 28 वर्षांपासून ही समस्या भेडसावत आहे. याबाबत अनेकवेळा संबंधितांच्या निदर्शनास आणून देऊनही उपयोग झाला नाही. मते मागायला येणारे लोकप्रतिनिधी एखादी समस्या निर्माण झाल्यावर फिरकतही नाहीत. लहान मुले, वृद्ध, दिव्यांग महिलांची या समस्यांमुळे परवड होत असून गटारातील सांडपाणी घरात शिरल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान होत आहे.
येथील लोक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देतात. पण मदतीला कोणी येत नाही. घरांमध्ये सांडपाणी शिरले असून मुलांचे राहणे अशक्य झाले आहे. अनेकवेळा सांगून आम्ही थकलो आहोत. अधिकारी आमच्या समस्या ऐकत नाहीत. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांना आमची समस्या सांगणार आहोत. आता जिल्हाधिकाऱ्यांनीच आमच्या समस्या सोडवाव्यात असा आग्रह येथील नागरिकांनी केला आहे.
पंधरा दिवसांपासून घरामध्ये सांडपाणी शिरत आहे. मात्र कोणीही समस्या सोडविण्यासाठी पुढे आले नाही. अनेकवेळा समस्या सोडविण्याची विनंती केली आहे. आजवर केवळ आश्वासने देण्यात आली असून अधिकारी मदत करत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे
आपल्या समस्या सोडविण्यासाठी आजवर कुणीही पुढाकार घेतला नसून आता जिल्हाधिकाऱ्यांनीच येऊन आमचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
Recent Comments