Belagavi

ग्रामीण भागात जादा बस सेवा उपलब्ध करा : ता. म. ए. समितीचे निवेदन

Share

बेळगाव तालुक्यातुन येणाऱ्या विद्यार्थ्यांचे अपुऱ्या बसेसअभावी हाल होत असून जीव मुठीत धरून बसप्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली आहे. यामुळे ग्रामीण भागात जादा बस सेवा उपलब्ध करण्यात याव्यात यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने परिवहन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने केएसआरटीसी विभागीय नियंत्रण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व बेळगाव तालुक्यातील बसेसची समस्या ग्रामीण भागात सकाळी 9 ते 11 व संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत कमी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांची अडचण होत असून, जीव मुठीत धरून प्रावास करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे अपघात घडले असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बसेसची संख्या वाढवावी.

शक्ती योजनेतून महिलांना सुविधा उपलब्ध करून दिल्याने सरकारची स्तुती होत असल्याचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. मात्र यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत असून सरकारने याकडे लक्ष द्यावे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती तालुका विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: