Belagavi

कचरेवाला नव्हे.. स्वच्छता कर्मचारी : जिल्हा न्यायाधीश टी. एन. इनवळ्ळी

Share

स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपण बऱ्याचवेळा ‘कचरेवाला’ असे संबोधतो. मात्र ते कचरेवाला नसून तेच खरे स्वच्छतेचे रक्षक आहेत, अशी प्रतिक्रिया बेळगाव जिल्हा प्रधान व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी. एन. इनवळ्ळी यांनी व्यक्त केली.

आज बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ आणि बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रधान व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी. एन. इनवळ्ळी यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पी. मुरली मोहनारेड्डी, बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस. किवडसण्णवर, पर्यावरण अभियंते हणमंत कलादगी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा प्रधान व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी.एन. इनवळ्ळी म्हणाले की, शहर स्वच्छतेसाठी महानगरपालिका अनेकवेळा जनजागृती करत आहे. ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने ठेवण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत. सुशिक्षित लोक देखील परिसर स्वच्छतेच्या सूचना, नियम पाळत नाहीत. मात्र सफाई कर्मचारी सुशिक्षितांच्या याच चुका सुधारून परिसर स्वच्छ ठेवतात. आपण स्वच्छता राखली तर सफाई कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही. स्वच्छता कर्मचारी हे कचरेवाला नसून ते खऱ्या अर्थाने स्वच्छता कर्मचारी आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशनचे सदस्य व बेळगाव महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी आदींचा सहभाग होता.

Tags: