२४ तासांहून अधिक काळ सुरु असलेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत बुधवारी सकाळच्या सुमारास ट्रॅक्टरखाली सापडून एका गणेश भक्ताचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कपिलेश्वर उड्डाणपूलावर घडली आहे.
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्ती ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनावरून कपिलेश्वर उड्डाण पुलावरून कपिलेश्वर तलावाकडे विसर्जनासाठी नेण्यात येत असताना सदर दुर्घटना घडली आहे. सदानंद बी. चव्हाण -पाटील (वय 48 रा. पाटील गल्ली, येळ्ळूर -सुळगा बेळगाव) असे मृत गणेशभक्ताचे नाव असून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उड्डाण पुलाच्या उतारावर ट्रॉलीमधून बाप्पाची मूर्ती घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर अचानक नियंत्रण सुटल्याने वेगाने पुढे गेल्याने हि घटना घडली आहे.
या घटनेत बेसावध असलेल्या सदानंद चव्हाण यांना ट्रॅक्टरची धडक बसून थेट ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर गेला. गंभीर जखमी झालेल्या सदानंद चव्हाण यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सदर घटना घडताच बेळगाव मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर विजय मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्येही भेट दिली.
बेळगावमध्ये घडलेल्या या घटनेनंतर मृत गणेशभक्तांच्या कुटुंबियांना प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने आर्थिक मदत देऊ करावी, असे आवाहन माजी महापौर विजय मोरे यांनी केले आहे.


Recent Comments