Belagavi

वयाच्या १९ व्या वर्षी तरुण मूर्तिकार साकारतोय गणेश मूर्ती

Share

लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने आईने आणि मोठ्या भावाने सांभाळ करत दिलेल्या शिक्षणाचे चीज करून आज आपल्या कलेची सेवा करणारा युवा मूर्तिकार बेळगावमधील हलगा या गावात नाव कमावत आहे. वयाच्या १९ व्या वर्षांपासून श्री गणेश मूर्ती साकारणाऱ्या या युवा मुर्तीकाराने कौशल्य वाखाणण्याजोगे आहे…

हलगा येथील युवा मूर्तिकार सुशांत लोहार या तरुणाने परिस्थितीवर मात करत आपली कला जोपासली आहे. वयाच्या १९ व्या वर्षांपासून श्री गणेश मूर्ती साकारणारे सुशांत लोहार यांनी १ मूर्ती बनविण्यापासून आज तब्बल ६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती साकारण्याचे काम हाती घेतले आहे. घरगुती गणेश मूर्ती बनविण्यासाठी सार्वजनिक मंडळांच्या गणपती मूर्ती बनविण्यात कुशल असलेल्या सुशांत लोहार यांनी आपल्या कलेची सुरुवात महाविद्यालयीन जीवनात केली.

पीओपीपेक्षा शाडूपासून मूर्ती बनविणे हि कला सुशांत लोहार यांना अधिक जवळची वाटते. ५ ते ६ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या शाडू मूर्ती बनविता येत नाहीत. यासाठी पीओपीचाच वापर करावा लागतो. मात्र पर्यावरणाची होत असलेली हानी लक्षात घेत पुढील काळात आपण शाडूपासून अधिक उंचीच्या मूर्ती कशा बनविता येतील यावर अभ्यास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोठा भाऊ सेंट्रिंग कामगार तर आई आशा कार्यकर्ती अशा परिस्थितीत वडिलांच्या नंतर सुशांतला भाऊ आणि आईचा मोठा पाठिंबा लाभला.

सध्या सुशांत लोहार यांच्याकडे ६ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती बनविण्याचे काम आले असून त्यांच्यासह त्यांचे मित्र आणि सहकारी देखील या कामात गुंतले आहेत. कोल्हापूरच्या कलामंदिर महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयीन जीवनात सुट्टीच्या वेळेत मूर्तिकला सुरु केली. हलगा येथे वास्तव्यास असणारा सुशांत हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढला असून आई आणि भावाच्या प्रेरणेतून कला आणि शिक्षण दोन्ही गोष्टीं जपल्या आहेत.

Tags: