श्रावणी अमावस्या आणि श्रावण महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी सुक्षेत्र सुळेभावी श्री महालक्ष्मी देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडला.
सुळेभावी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविक हजर होते. यावेळी महिलांनी देवीची ओटी भरून प्रार्थना केली. श्रावण महिन्यातील अमावस्येच्या निमित्ताने मंदिर फुलांनी सजवून आकर्षक आरास करण्यात आली होती.
देवीच्या पूजेसाठी पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती. भाविकांची गर्दी लक्षात घेत विशेष दर्शन व मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.
मंगळवारी शेवटच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीचा पालखी सोहळा पार पडला. मंदिरात पालखी प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार समिती व पुजारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील झांज पथक, ढोल ताशा, भजन यांसह विविध मंडळांनी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंगळवारी दुपारी मुसळधार पाऊस असूनही या पावसात भाविकांनी रांगेत थांबून दर्शनाचा लाभ घेतला, हे विशेष. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.


Recent Comments