मद्यधुंद अवस्थेत बस चालविणाऱ्या बसचालकाने अतिवेगात रस्त्याच्या कडेला जाऊन बस आदळल्याने अपघात झाल्याची घटना बेळगाव – यल्लापूर नजीक घडली आहे.
बेळगाव यल्लापूर बस खानापूर तालुक्यातील बिडी – कक्केरी नजीकच्या रस्त्यावर येऊन गस्तोळी – शिवाजीनगर नजीक आल्यावर हा अपघात घडला आहे. बसचालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता. यादरम्यान वेगावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. बसच्या वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेकवेळा सूचना करूनही बसचालकाने दारूच्या नशेत बस वेगाने चालविल्याने हा अपघात घडल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी सांगितले.
अपघात घडल्यानंतर त्याचक्षणी बसचालक आणि वाहक दोघेही फरार झाले असून या अपघातात एका विद्यार्थिनीच्या पायाला जखम झाली आहे. तर चिमुरडी देखील जखमी झाल्याचे समजते. याचबरोबर बसमधून प्रवास करणारे इतर प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. या बसमधून लिंगनमठ शाळेतील विद्यार्थी खानापूर मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जात होते. जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले आहे.


Recent Comments