तीस वर्षांवरील असंसर्गजन्य रुग्णांना घरोघरी जाऊन आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. पहिल्या टप्प्यात गृह आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील आठ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात बेळगाव जिल्ह्याचा समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी म्हणाले.
1 सप्टेंबरपासून घरोघरी आरोग्य योजनेंतर्गत तीस वर्षांवरील असंसर्गजन्य रुग्णांना घरोघरी जाऊन आरोग्य सेवा पुरविण्याची सर्व तयारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी बेळगाव येथे पत्रकारांना दिली. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त असलेल्यांना योग्य आरोग्य सेवा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या दारात सर्वसमावेशक असंसर्गजन्य रोग तपासणी, व्यवस्थापन आणि औषध वितरण सेवा देण्यासाठी घरोघरी भेटी देण्याची तयारी केली आहे.
बेळगाव जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 47, 79, 661 आहे. यामध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 19,11,864 लोक आहेत. कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्याची तयारी केली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात 117 आरोग्य संनियंत्रण अधिकारी, 436 सामुदायिक आरोग्य अधिकारी, 320 प्राथमिक सुरक्षा अधिकारी आणि 3,677 आशा कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments